राज्य सरकारमधील पवार व शिंदे गटात धुसफूस

0
26

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

महाराष्ट्र सरकारमधल्या अजित पवार गट आणि शिंदे गटात धुसफूस सुरु आहे. अजित पवार गटाने विकास निधी वाटपावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात दिल्लीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाहा यांची भेट घेतली होती. यावेळी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. विकासनिधी वाटपात तीन पक्षाचे आमदार यांना समानता हवीय मात्र, तसे प्रत्यक्ष होताना दिसत नाही. शिंदे गटाचे मंत्री विकास निधी वाटप करताना अजित पवार गटाच्या आमदारांना कमी देतात, अशी तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीत सामील झाल्यानंतर अवघ्या चारच महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत अजित पवारांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याचंही बोलले जात आहे. शिंदे गटाला अधिक विकास निधी दिला जातो तर अजित पवार गटाला तुलनेनं कमी विकास निधी दिला जातो, अशी तक्रार अजित पवारांनी अमित शाहांकडे केल्याचे समजत आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे.
अमित शाहांकडे तक्रार करता करता अजित पवार रडले पण त्यांना तक्रारीपुरते मर्यादीत ठेवा, ते रडून आले,असे कुठेही सांगू नका, असे मला कुणीतरी सांगितले, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवारांची नाराजी चेहरा
पाहिला तरी दिसते : रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी अलीकडेच शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद देण्यात आले. अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद देण्यात आले असले तरी त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण असल्याचे बोलले जात आहे.अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना अजित पवार पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अलीकडेच अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना (अजित पवार गट) निधी दिला जात नसल्याची तक्रार केल्याचेही बोलले जात आहे. यावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे नक्कीच नाराज आहेत.त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी ही बाब लक्षात येते, असे सूचक विधान रोहित पवार यांनी केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“अजित पवारांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर ते नक्कीच नाराज आहेत, असे कुठेतरी जाणवते. त्यांची नाराजी वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकते. भाजपाला लोकनेता कधी पटत नाही. त्यांना त्यांच्या पक्षातला किंवा बाहेरून आलेला, कोणताही लोकनेता पटत नाही. अशा लोकनेत्यांची ताकद भाजपा हळूहळू कमी करतो. तीच गोष्ट भाजपाने अजितदादांच्या बाबतीत केली आहे,” असे विधान रोहित पवार यांनी केले.
खजिन्याची चावी तुमच्याकडे तरी….
अजित पवारांच्या नाराजीबाबत विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले, “अजित पवार कधी खूश राहिले, ते नेहमीच नाराज असतात. त्यांच्या मनाप्रमाणे झाले तर ते खूश होतात. मनाविरुद्ध झाले तर नाराज. ‘हम करे सो कायदा’अशा पद्धतीने त्यांची भूमिका असते. आता तीन पक्षांच्या सरकारमध्ये त्यांना वाटतं की, निधी मिळत नाही. अरे खजिन्याची चावीच तुमच्याकडे आहे, मग तुम्ही दुसऱ्यांकडे तक्रार का करता? आता तुमची धमक दाखवा.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here