लाभार्थी वंचितांना धान्य वेळेवर मिळण्याची होतेय मागणी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील हरीविठ्ठल नगर भागातील दारिद्र्य रेषेखालील आणि दिव्यांग धान्यापासून वंचित राहत आहे. याकडे संबंधित विभागासह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वंचितांना धान्य वेळेवर मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. धान्याचा काळा बाजार न चुकता सुरू आहे. याबाबत फोटोसह व्हिडीओ पुरावे काही नागरिकांकडे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रेशन दुकानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह शासकीय कर्मचारी उपस्थित राहणे गरजेचे असल्याची अपेक्षाही दिव्यांग लाभार्थ्यांनी बोलून दाखविली आहे. लाभार्थ्यांना मिळणाऱ्या हक्काच्या धान्याचा काळाबाजार थांबवून तो लाभार्थ्यांना मिळावा, अशीही मागणी दिव्यागांनी केली आहे.
शासनाने अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्ड धारकांना नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानदारामार्फत कार्ड अपडेट नाही, इतर कारणे आणि त्रुटी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रेशनचे धान्य मिळत नाही. यासोबतच तहसील कार्यालयातून पुरवठा होत नाही. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना भेटा, असे सांगितले जाते. त्यानंतर अनेकवेळा दिव्यांग कार्डधारक अधिकाऱ्यांंना संपर्क केल्यावर उडवाउडवीचे उत्तरे मिळतात. यासोबतच अनेक चकरा माराव्या लागण्याची वेळ येते. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी आपदा मित्र जगदीश बैरागी यांची भेट घेऊन त्यांच्याजवळ व्यथा मांडली. त्यानंतर त्यांनीही अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर अधिकारीही जबाबदारी झटकतात. त्यामुळे त्यांनाही संबंधितांकडून उडवाउडवीचे उत्तर मिळाले. शासनाच्या योजनांची माहिती देणेही अधिकाऱ्यांनी कठीण वाटू लागले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करुन दिव्यांग लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळावे, अशी मागणी होत आहे.