विठ्ठलाच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले
साईमत/मालेगाव/प्रतिनिधी :
येथील मालेगाव कॅम्पमधील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित के.बी.एच. विद्यालय (दुपार सत्र) येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र टाकळीतील शिवसेवा वारकरी शिक्षण सेवा संस्थेचे संस्थापक सचिन महाराज यांच्यातर्फे ह.भ.प. परमेश्वर महाराज घाटे (बुलढाणा) यांचे प्रवचन आणि दिंडी काढण्यात आली. यावेळी त्यांच्या हस्ते श्रीविठ्ठलांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य प्रफुल्ल निकम यांनी ह.भ.प. परमेश्वर महाराज यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. महाराजांनी वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून विद्यार्थ्यांना दृष्टांत सांगून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पर्यवेक्षक के.डी. देवरे, व्ही.ए.दासनूर, ज्येष्ठ शिक्षक डी.डी.शिरोळे, एम.एम.बच्छाव, कार्यालयीन प्रमुख मानूर भाऊसाहेब, ग्रंथपाल एम.एस.भदाणे आदी उपस्थित होते. दिंडीला पी.जे.पवार, वाय.एस. ठोके यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाच्या प्रांगणातून सुरूवात झाली. विद्यामंदिर संस्थेच्या प्रांगणातील ज्ञानेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन दिंडीचा शाळेच्या प्रांगणात समारोप झाला.
विद्यार्थी भक्तीमय वातावरणात झाले दंग
सोहळ्यात दृवांश नाना घोडके, सोनवळकर,रविकांत ह्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाची वेशभूषा परिधान केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दिंडीत लेझीम पथकासहित विद्यालयातील सर्व विद्यार्थी भक्तीमय वातावरणात दंग झाले होते. दिंडीत व्ही. पी. पवार, ए. आर. माने यांनी फुगडी खेळून आनंद घेतला. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन ठोके.वाय.एस तर आभार एम.डी. भामरे यांनी मानले.