जामनेर विधानसभेत पुन्हा श्रीराम पाटील पुनरावृत्तीची शक्यता
जामनेर विधानसभा मतदार संघात येत्या निवडणुकीत भाजपाचे राज्यातील पहिल्या फळीतील नेते व ग्रामविकासमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्यासमोर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांना प्रबळ दावेदार म्हणून पुढे आणले गेले आहे.भाजपाच्या मुशीतून राजकारणात असलेले खोडपे सर यांना महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमेदवारी जाहीर करण्याचे अंतिम टप्प्यात आहे. पण त्यांना प्रोजेक्ट करतांना केवळ सामाजिक मतदानाचे गणित मांडून एक नेरेटिव्ह इथे तयार केला जात असल्याने गत लोकसभेत झालेल्या श्रीराम पाटील यांच्या पराभवाची पुनरावृत्ती जामनेर विधानसभा निवडणुकीत कशावरून होणार नाही,अशी चर्चा आहे.
जामनेर तालुक्यातील सर्वात मोठ्या नेरी गावातून आपला राजकीय प्रवास पुढे घेऊन गेलेले दिलीप खोडपे सर त्याच गावातील हायस्कुलमधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त अगदी भला माणूस म्हणून सर्वांना परिचित आहे. १५ सप्टेंबर रोजी अचानक त्यांनी आपल्या भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि खोडपे सर मंत्री गिरीशभाऊ यांना तगडी फाईट देऊन अगदी सहज विजयी होतील अशी संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरु झाली नव्हे सोशल मीडियातून पसरविण्यात येत आहे.विशेषत: खोडपे सरांना पुढे करतांना ‘मराठा कार्ड’ वापरून एक सामाजिक मतदार संख्या दर्शवणारे व त्यांच्या सहज विजयाचा दावा सांगणारे नेरेटिव्ह सुद्धा चांगलेच चर्चेत आहे.पण या एकूणच तीन-चार दिवसात मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी यावर प्रत्येक ठिकाणी बोलणे किंवा माध्यमांनी विचारल्यावर व्यक्त होणे टाळल्याचे दिसून आल्याने जितक्या तोंडानी खोडपे सरांची चर्चा होतेय त्याच प्रमाणात एका मोठ्या समाजाच्या जोरावर छोट्या समाजांना कमी लेखणाऱ्या या प्रकाराची निंदा सुद्धा होतेय. समाजाच्या एकगठ्ठा मतदानाच्या जोरावर विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक जिंकता येत नाही असा या चर्चेचा सुर असून उथळ पद्धतीने वातावरण काबीज करणाऱ्या खोडपे सरांच्या समर्थकांनी गिरीशभाऊ यांच्या तालुक्यात खोलवर रुजलेल्या पाळेमुळांचा गांभीर्याने विचार केलेला दिसत नसल्याचे सुद्धा बोलले जात आहे.गेल्या लोकसभा निवडणूकीत मराठा कार्ड म्हणून उद्योजक श्रीराम पाटील यांना पुढे केले असतांना त्यांच्याविरोधात नुसत्या जामनेर विधानसभा मतदारसंघातून ३४ हजार मतांची आघाडी होती. त्यामुळे निवडणुकीत मतांसाठी सामाजिक अभिसरण प्रक्रिया राबवून पसरवलेले नेरेटिव्ह मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या पथ्यावर पडणार असल्याचे प्राथमिक टप्प्यात तरी दिसून येत आहे.
मंत्री महाजनांविरोधात आभासी चित्र
जामनेर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणूकीत आपले मताधिक्य चढत्या आलेखाने साबित ठेवणारे गिरीशभाऊ महाजन यांच्याविरोधात २००४ मध्ये संजय गरुड यांच्या प्रचारार्थ छावा संघटनेचे अण्णासाहेब जावळे यांनी प्रचार सभा घेऊन असाच सोशल नेरेटिव्ह पसरवला त्याचा उलट परिणाम होऊन मंत्री महाजन त्यावेळी तब्बल तीस हजारांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यामुळे खोडपे सरांना पुढे करून गिरीशभाऊ यांना आव्हान उभे करण्याची चर्चा सद्यातरी आभासी वाटतेय.
जामनेरवर असलेली पकड महाजन सहज ढिली होऊ देतील ?
राज्याच्या भाजपा आणि सद्याच्या महायुती सरकारमधील प्रभावी नेत्यांच्या पुढच्या रांगेतील नेता म्हणून गिरीशभाऊ महाजन यांनी आपले होमग्राऊंड अगदी सुरक्षित राहील याची काळजी घेतली असल्याचे दिसून येते.पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा अनुभव असलेल्या खोडपे सरांना राजकारणात आपल्याला विरोधकच शिल्लक ठेवायचा नाही या दिशेने संघटना बांधलेले गिरीशभाऊ यांच्या विरोधात खूप जड जाईल कारण मंत्री महाजन आपली तीस वर्षांची मतदारसंघावरील पकड सहज ढिली होऊ देणार नाही असेही बोलले जात आहे.त्यांनी जामनेर शहराचा केलेला विकास, अनेक लहान -मोठ्या धरणांमुळे मतदारसंघातील शेतांना बारमाही झालेला सिंचनाचा फायदा,बसस्टॅन्डचे झालेले पोर्ट,कॉटन हबसाठी मतदारसंघात सुरु असलेला पाठपुरावा, तालुक्याला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची झालेली कामे अशा अनेक विकासकामांचा लेखाजोखा आणि कार्यकर्त्यांची एकसंघ मजबूत फळी हे अजोड समीकरण पाहता मंत्री महाजन यांना थांबवण्याचे सुरु झालेले प्रयत्न आजतरी तोडके म्हटले पाहिजे. दरम्यान,खोडपे सरांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून सुरु झालेला महाजनांच्या विरोधकांची कोल्हेकुई व आनंदोत्सवाचा धिंगाणा हा औट घटकेचा असल्याचे आजतरी स्पष्ट दिसत आहे.