साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची १०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील माळी समाजाच्या मंगल कार्यालयात नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सुनील क्षीरसागर होते. यावेळी ज्या-ज्या मान्यवरांनी विविध क्षेत्रात कार्य करीत असताना गावाचे नाव मोठे केले. तसेच वेगवेगळे पुरस्कार प्राप्त केले. अनेक विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केले. अशा मान्यवरांचा स्मृतीचिन्हासह शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. त्यात लोहारा येथील कृषीभूषण विश्वासराव शेळके, अर्जुन भोई, शैलेश पालीवाल, अमोल सोनवणे, मुरलीधर जाधव, प्रा.डॉ गुणवंतराव शेळके, ओमकार शिंदे, कैलास सरोदे अशा मान्यवरांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
प्रास्ताविकात संस्थेचे माजी चेअरमन तथा भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद सोनार यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. अहवालाचे वाचन संस्थेचे सचिव रमेश शेळके यांनी केले. तसेच पुढील वर्षामध्ये संस्थेकडून सुरू करण्यात येणाऱ्या जेनेरिक मेडिकल व महा-ई सेवा केंद्र याबद्दल माहिती दिली. लवकरच संस्थेमार्फत गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप सुरू करण्याचा विचार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सभेला सरपंच अक्षय जैस्वाल, पोलीस पाटील सुरेंद्र शेळके, उपसरपंच दीपक खरे, शिवराम भडके, बाबुलाल बोरसे, लक्ष्मण माळी, डॉ.सुभाष घोंगडे, माणिक निकुंभ, युवराज पाटील, कृष्णराव शेळके, महेंद्र शेळके, रमेश चौधरी, दीपक पवार, ईश्वर देशमुख, लक्ष्मण बाविस्कर, कैलास चौधरी, माणिक कासार यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक संजय सुर्वे यांनी केले.
असेच कार्यक्रम विकासोने राबवावेत
लोहारा विकासोने या वर्षांपासून जो गावातील मान्यवर गुणवंतांचा सत्कार केला. त्यामुळे गावातून विकासो चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य यांचेही कौतुक होत आहे. यापुढेही असेच कार्यक्रम विकासोने राबवावेत, असे मत गावातील मान्यवरांनी व्यक्त केले.