आसोद्यातील सार्वजनिक विद्यालयात आयोजित व्याख्यानात प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छता निरोगी जीवनाचा ‘मंत्र’ असल्याचे प्रतिपादन डॉ. श्रद्धा चांडक यांनी केले. जळगाव तालुक्यातील आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात लिनेन क्लबच्यावतीने आयोजित “कॅन्सर रोगनिदान” विषयावरील व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लिनेन क्लबच्या अध्यक्षा रेश्मा बेहरानी, विजू बाफना, रेखा वर्मा आदी उपस्थित होत्या. याप्रसंगी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
कॅन्सरचा आजार शरीराच्या कोणत्याही अवयवाला होऊ शकतो.तंबाखू, गुटखासारख्या व्यसनांमुळे मुख व आतड्यांचा कॅन्सर वाढतो. तसेच विद्यार्थ्यांना योग्य आहार, व्यायाम आणि स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगत त्यांच्या शंकांचे निरसन केले. कामाच्या आणि अभ्यासाच्या धावपळीमुळे माणूस स्वतःकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे व्यसनांकडे वळतो. त्यामुळे आरोग्याच्या असंख्य समस्यांचा सामना करावा लागतो, असेही प्रभावी मार्गदर्शन डॉ.चांडक यांनी केले. सूत्रसंचालन वृषाली चौधरी तर आभार हेमलता सोळंके यांनी मानले.