साईमत, चोपडा : प्रतिनिधी
राज्यातील ६५ हजार सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय रद्द करा, जिल्हा परिषदेच्या १४ हजार ७८३ शाळा बंद करू पाहणारी समूह शाळा योजना रद्द करा, कंपन्यांचा सी.एस.आर. फंड शासनाकडे जमा करा, राज्याच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी भरीव तरतूद करावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील सर्व आस्थापनाच्या सर्व शिक्षक संघटनातर्फे तहसील कार्यालयासमोर सोमवारी, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ वाजे दरम्यान धरणे आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. सायंकाळी ५ वाजता तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना संघटना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
यावेळी शिक्षक नेते आर.एच.बाविस्कर, ग. स.चे संचालक मंगेश भोईटे, संभाजी पाटील, देवेंद्र पाटील आदींनी शासनाचे धोरण विद्यार्थी आणि पालकांसाठी कसे धोकादायक आहे हे सर्व शिक्षकासमोर मांडले. धरणे आंदोलनात चोपडा तालुका संस्थाचालक संस्था महामंडळ, चोपडा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक संघ, शिक्षक, शिक्षकेतर संघ, चोपडा तालुका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक संघटना, चोपडा तालुका खासगी प्राथमिक शिक्षक संघटना, आश्रमशाळा शिक्षक संघटना, चोपडा तालुका ज्युक्टो शैक्षणिक संघटना, इतर सहयोगी शैक्षणिक संघटना, चोपडा तालुका महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनामधील पदाधिकारी व सर्व शिक्षक सहभागी झाले होते.