धरणगावला स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

0
20

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

येथील स्वामी विवेकानंद नागरिक सहकारी पतसंस्थेला नुकतेच पंचवीस वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल रौप्य महोत्सव वर्ष म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्त सलग तीन दिवस विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. त्यात रक्तदान शिबिर, रोगनिदान शिबिर आणि व्याख्यानाच्या कार्यक्रमाचा समावेश होता.

पतसंस्थेच्या पंचविसाव्या रौप्य महोत्सवानिमित्त पतसंस्थेतर्फे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन केल्यानंतर भव्य रक्तदान व रोगनिदान शिबीर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक निबंधक विशाल ठाकूर होते. उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर, जिल्हा उपाध्यक्ष रोहीत निकम उपस्थित होते.

लाड शाखीय वाणी मंगल कार्यालयात झालेल्या शिबिरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच ६५ नागरिकांनी रोगनिदान शिबिराचा लाभ घेतला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला सन्मानचिन्ह तसेच माधवराव गोळवलकर रक्त संकलन केंद्रातर्फे ५० हजारांचा अपघाती विमा १ वर्षाकरीता काढण्यात आला. यासोबत ह.भ.प. विश्‍वनाथ महाराज वाडेकर यांनी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम झाला.

समारोपाला शेवटच्या दिवशी भडगाव येथील व्याख्याते प्राचार्य सुनील पाटील यांनी युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान घेण्यात आले. रोगनिदान शिबिरात डॉ. विलास भोळे, डॉ. अनिता भोळे यांच्यासह विविध डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. त्यात असंख्य गरजु नागरिकांनी तपासणी करुन सहभाग नोंदविला. प्रास्ताविकात संस्थेचे चेअरमन ॲड.वसंतराव भोलाणे यांनी संस्थेचा प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी परिसरातील भाविक, नागरिक, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

सहकार क्षेत्रातील स्पर्धेच्या युगात संस्थेने केलेल्या प्रगतीचे कौतुक करुन चेअरमन यांच्यासह संचालक मंडळ कौतुकास्पद पात्र असल्याचे ना.गुलाबराव पाटील यांनी शुभेच्छा देऊन नमुद केले. तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही संस्थेच्या विविध विषयावर मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन वाय.जी.पाटील, व्यवस्थापक वासुदेव महाजन तर आभार व्हाईस चेअरमन सुधाकर वाणी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here