साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
येथील स्वामी विवेकानंद नागरिक सहकारी पतसंस्थेच्यावतीने रौप्य महोत्सवानिमित्त १२, १३, १४ जानेवारी २०२४ दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी, १२ जानेवारी रोजी वर्धापन दिनानिमित्त स्वामी विवेकानंद नागरी पतसंस्थेच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त तसेच स्वामी विवेकानंद व माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आणि रोगनिदान शिबिराचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी जिल्हा निबंधक विजयसिह गवळी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून धरणगावचे सहायक निबंधक विशाल ठाकूर उपस्थित राहतील. धरणगाव तालुक्यातील सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक व नागरिक यांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रक्तदान शिबिराचे उद्घाटक जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, अध्यक्षस्थानी समरसता मंचचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य प्रा.आर.एन.महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जिल्हा उपाध्यक्ष रोहीत निकम उपस्थित राहतील.
माधवराव गोळवलकर रक्तपेढी संकलन केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लाड शाखीय वाणी मंगल कार्यालयात शुक्रवारी, १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शिबिराचे आयोजन केले आहे. त्यात प्रत्येक रक्तदात्याला सन्मानचिन्ह तसेच माधवराव गोळवलकर रक्त संकलन केंद्रातर्फे ५० हजाराचा अपघाती विमा १ वर्षाकरीता मिळेल. सोबत आधार कार्ड व वारसाचे नाव देणे अनिवार्य राहील.
शनिवारी, १३ जानेवारी रोजी धरणगाव येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. येथे रात्री ८:३० वाजता खान्देश भूषण, विनोदी तसेच समाज प्रबोधनकार, ह.भ.प. विश्वनाथ महाराज वाडेकर यांचा जाहीर किर्तन सोहळा होईल. रविवारी, १४ जानेवारी रोजी प्राचार्य सुनील पाटील, भडगाव (शिव चरित्रकार, संत चरित्रकार) यांचे ‘युग पुरुष स्वामी विवेकानंद’ ह्या विषयावर रात्री ८:३० वाजता लाड शाखीय वाणी मंगल कार्यालय, धरणगाव तसेच भव्य रोगनिदान शिबिर, स्त्रीरोग तपासणी शिबिर होईल.शिबिराचा शहरासह परिसरातील नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन ॲड वसंतराव भोलाणे, व्हाईस चेअरमन सुधाकर वाणी यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.