साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
शहरात सार्वजनिक जागेवर बेकायदेशीर बॅनर्स, पोस्टर्स, होर्डींग लावल्याने धरणगाव शहराचे व सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण होत आहे. ठिकठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग्जचे पेव फुटल्याचे दिसत आहे. यामध्ये सगळ्यात जास्त होर्डिंग्ज आणि पोस्टर्स राजकीय पक्षांची आणि दुकानदारांच्या जाहिरातीचे आहेत. शहरातील बऱ्याच दुकादारांकडून दुकानासमोर मोठमोठे फलक लावलेले दिसून येतात. मात्र, नगर परिषदेकडून यावर कधीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा सरकारी महसूल बुडत आहे. शहरात विविध ठिकाणी भलेमोठे होर्डिंग, बॅनर लावलेले आहेत, यापैकी धरणगाव बस स्थानकाच्या आवारात फाटलेल्या अवस्थेत होर्डींग, तसेच धरणगाव-चोपडा-अमळनेर-जळगाव महामार्गालगत व्हाईट हाऊस समोरील खासगी इमारतीवर भलेमोठे अवाढव्य बॅनर फाटक्या अवस्थेत गळून पडलेले आहे आणि सद्या वादळ वाऱ्याचे वातावरण असल्याने हवेमुळे बॅनर उडून पडल्याने वर्दळीच्या ठिकाण असलेल्या महामार्गावर मोठा अपघात होऊ शकतो. विशेष म्हणजे घाटकोपर येथे लावलेल्या फ्लेक्स, बॅनरने अनेक निरपराध नागरिकांचा जीव घेतला. म्हणून धरणगाव शहरातील प्रशासन मात्र अश्या प्रकाराकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने जनतेतून ओरड होत आहे.
बेकायदेशीररित्या उभारलेले बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग्ज, पोस्टर्स काढून टाकावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाने कारवाई करण्याचे निर्देश दिले असतानाही न्यायपालिकेचे निर्देशांचे अवमान व उल्लंघन करताना धरणगाव नगरपालिका निरंतर दिसून येते. सण, उत्सव असोत की कार्यकर्ता वा नेत्याचा वाढदिवस, किंवा कोणाची मोठ्या पदावर नियुक्ती, अथवा समर्थनासाठी शहरात रातोरात गल्लीबोळापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत शहरात बेकायदा बॅनर, होर्डिंग्ज लावले जातात. रस्त्यावरील विद्युत खांबांवर किंवा इतर मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावण्यात येत असून काही वेळेला बॅनरमुळे दिशादर्शक फलक झाकले जातात. मात्र, त्याचे कोणालाच काही गांभीर्य राहिलेले दिसत नाही.
बस थांब्यांवरही बॅनर लावले जात असून बॅनर लावण्यामध्ये राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आघाडीवर असतात. अनेकदा संपूर्ण शहर होर्डिंगमय होऊन जाते. जिकडे नजर जाईल तिकडे बॅनर, होर्डिंग्ज नजरेस पडतात. अनेक भिंतीवरही भिंतीपत्रके लावून भिंतीचे विद्रुपीकरण करण्यात येते. परंतु, अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरुद्ध पालिका प्रशासनाकडूनही कडक कारवाई होत नसल्याचे दिसून येते.