
दत्तजन्मोत्सव महाआरतीने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
येथील जुने गावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञा व आशिर्वादाने २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान अखंड नामजप, यज्ञ-याग, प्रहारे आणि सामूहिक गुरुचरित्र पारायणाचा उत्सव उत्साहात पार पडला. २८ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या सप्ताहाची भक्तिभावात सांगता करण्यात आली.
सप्ताहभर दररोज सकाळी भूपाळी आरतीने दिवसाची सुरुवात होत होती. त्यानंतर सामूहिक गुरुचरित्र पारायण, १०.३० वाजता नैवेद्य आरती, गणेश याग, मनोबोध याग, स्वामी याग, गीताई याग, श्रीचंडी याग, मल्हारी व रुद्र याग असे विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले. दुपारी १२.३९ वाजता नित्य स्वाहाकार, बळी पूर्णाहुती आणि दत्तजन्मोत्सव महाआरतीने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
आज सत्यदत्त पूजन व देवता विसर्जनाने सप्ताहाची औपचारिक सांगता होणार आहे.सप्ताहादरम्यान मोठ्या संख्येने श्रद्धाळूंनी आरती व प्रसादाचा लाभ घेतला. समाप्तीच्या दिवशी सेवेकऱ्यांच्या घरचे जेवणाचे डबे देवास अर्पण करून मांदियाळी करण्याची परंपरा यंदाही उत्साहात पार पडली. गुरुचरित्र वाचनासाठी ११६ महिला-पुरुष सेवेकरी अखंड बसले होते. प्रहर सेवेत सकाळी ७ ते सायंकाळी ७ महिला वर्ग तर रात्री ७ ते सकाळी ७ पुरुष सेवेकरी सहभागी होत होते. सर्व सेवेकऱ्यांच्या परिश्रमांमुळे सप्ताहाचे आयोजन यशस्वीपणे पार पडल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या गजराने परिसर दुमदुमून गेला.
दरम्यान, मुक्ताईनगर शहरातील रेणुकानगर परिसरात तसेच बसस्थानक आगार येथेही दत्तजयंती भक्तिभावात साजरी करण्यात आली. आगारामार्फत उद्या बसचालक व कर्मचारी वर्गासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे मुक्ताईनगरमध्ये तीन ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव भाविकांच्या मोठ्या उत्साहात पार पडला.


