जयजयकार आणि भक्तिगीतांच्या गजरात परिसर दुमदुमूला
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
तालुक्यात नवरात्रोत्सवाची धामधूम जोरात सुरू आहे. शहर व ग्रामीण भागात भक्तिभावाने वातावरण उदंड आहे. यंदा नवरात्रीची पहिली माळ दि.२२ सप्टेंबर रोजी पाटणादेवी येथे संपन्न झाली. जिथे सकाळपासूनच तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी पावसाच्या रिमझिम सरींमध्ये देखील देवी दर्शनासाठी गर्दी केली. जयजयकार आणि भक्तिगीतांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला.
यंदा शहरातील ६० आणि तालुक्यातील ३५ अशा एकूण ९५ नवरात्रोत्सव मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करून देवीची स्थापना केली आहे. या काळात मंडळांकडून जल्लोषात देवी मूर्तींची मिरवणूक आयोजित केली गेली. तसेच, धार्मिक विधींसोबतच समाजोपयोगी उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचीही तयारी करण्यात आली आहे. घटस्थापनेसाठी आवश्यक पूजा साहित्य खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेतही भाविकांची मोठी गर्दी दिसून आली.
नवरात्रोत्सव शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने “एक मंडळ-एक अंमलदार” ही विशेष योजना राबविली आहे. प्रत्येक मंडळासाठी अंमलदार नियुक्त करण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. नागरिकांना शांततेत आणि अनुशासनबद्ध पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, परवानगीतील अटींचे पालन आणि सामाजिक सलोखा राखण्याबाबत मंडळांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.नवरात्रोत्सव हा भक्तिभाव, उत्साह आणि एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव आहे. यंदाही हा उत्सव सुरक्षिततेच्या वातावरणात पार पडेल, अशी खात्री पोलिस प्रशासनाने दिली आहे.