२५ पैकी ९ कोटी प्राप्त; उर्वरित निधी लवकरच देण्याचे मंत्र्यांचे आश्वासन
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिराचा विकास प्रकल्प गेली अनेक वर्षे अपूर्णावस्थेत अडकलेला आहे. सन २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने १०० कोटी रुपयांच्या प्रस्तावित आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांना मंजुरी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ ९ कोटी रुपयांचा निधी आजपर्यंत उपलब्ध झाला असून उर्वरित निधी मिळालेला नाही. निधीअभावी मंदिराचे काम थांबले असून आजही संत मुक्ताई मंदिर कळसाविना उभे आहे.
२०१८ नंतर शासनाकडून एकाही रुपयाचा निधी प्राप्त झाला नसल्याने प्रकल्प पूर्णतः रखडला आहे. मंदिराच्या कळसापासून ते प्रमुख बांधकामांपर्यंत अनेक कामे अपूर्ण असून भक्त आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पंढरपूर व शिर्डी येथे जसा सुसूत्र विकास आराखडा राबवून भव्य कामे करण्यात आली, त्याच धर्तीवर संत मुक्ताई मंदिराचा विकास होणार की नाही, याबाबतचा प्रश्नही पुन्हा उपस्थित झाला आहे.
या सर्व बाबींबाबत सरकारचे लक्ष वेधण्यात आले असता संबंधित मंत्र्यांनी आश्वासन दिले की मंजूर २५ कोटींपैकी उर्वरित निधी शिखर समितीच्या मान्यतेनंतर लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच काम अनेक वर्षे रखडल्याने वाढलेल्या किंमतीनुसार सुधारीत मान्यता देण्यासंदर्भातही आवश्यक कार्यवाही केली जाईल. प्रस्तावित १०० कोटींच्या आराखड्याबाबतही सकारात्मक निर्णय प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
