भुसावळला स्वस्त धान्य दुकानदारांचे ‘ई-पॉस मशीन जमा करो’ आंदोलन

0
53

तहसीलदार निता लबडे यांना निवेदनासह मशीन केले सुपूर्द; सर्व्हर समस्या लवकर सोडविण्याची मागणी

साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :

भुसावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांच्यावतीने सोमवारी, ५ ऑगस्ट रोजी ‘ई-पोस मशीन जमा करो’ आंदोलन करून तहसीलदार निता लबडे यांना निवेदन देऊन पुरवठा विभातील गुरव यांच्याकडे भुसावळ तालुक्यातील ई पोस मशीन जमा करण्यात आल्या. सर्व्हर समस्या लवकर सोडण्यात यावी, अशी मागणीही स्वस्त धान्य दुकानदारांनी केली.

तहसीलदार निता लबडे यांच्याशी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी भेट घेऊन ई-पोस मशीन सर्व्हर अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यानंतर पुरवठा विभागातील गुरव यांच्याकडे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी सोबत आणलेल्या ई-पोस मशीन देण्यात आल्या. यावेळी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी “ई पोस मशीन सुरू झालीच पाहिजे झालीच पाहिजे” अशा घोषणा देऊन तहसील परिसर दणाणून सोडला. तहसीलदार निता लबडे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, राज्यात साधारण ५२ हजार स्वस्त धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणानंतर २०१८ पासून ई पोस् मशीनद्वारे धान्य वितरण करत आहेत. परंतु मागील दोन महिन्यांपासून ई पोस मशीन वर धान्य वितरण करताना सातत्याने होणारे सर्व्हर डाऊन या प्रकारच्या येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे धान्य वितरण करता येत नाही आहे. लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना धान्यासाठी ताटकळत उभे रहावे लागत आहे. स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्यसाठा उपलब्ध आहे. मात्र, धान्य वितरण करू शकत नाही. याबाबत तालुका स्तरापासून जिल्हा आणि राज्यस्तरावर अनेकवेळा तक्रारी निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारे सकारात्मक उपाय योजना न झाल्यामुळे ५ ऑगस्ट रोजी स्वस्त धान्य दुकानदार यांनी तहसील कार्यालयात ई-पोस मशीन जमा करून आंदोलन केले.

कॅरी फॉरवर्ड वाटप करण्याची परवानगी द्यावी

जुलै महिन्याचे धान्य ऑगस्ट महिन्यात कॅरी फॉरवर्ड वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी किंवा आजच पर्यायी व्यवस्था लाभार्थी वंचित राहू नये, म्हणून करावी. आगामी काळात सण उत्सव आहे. त्याचाही विचार शासनाने करावा आणि सर्व्हरची समस्या लवकर सोडवावी, अशी मागणीही केली आहे.

आंदोलनात यांनी घेतला सहभाग

आंदोलनात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील, रावेर विभागीय अध्यक्ष संतोष माळी, जळगाव जिल्हा सचिव सुनील अंभोरे, तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, कैलास उपाध्याय, तालुका उपाध्यक्ष सी. आर. पाटील, तालुका सचिव उल्हास भारसके, संघटक ईश्वर पवार, शहराध्यक्ष आरिफ मिर्झा, कार्याध्यक्ष पंकज पाटील, शहर उपाध्यक्ष राजेश सैनी, सचिव यशवंत बनसोडे, टीना धांडे, आरती जोहरी, लक्ष्मी सुरवाडे अनिता आंबेकर, शांताराम इंगळे, पराग वाणी, विजय मेढे, दत्ता पाटील, संगीता पाटील, राहुल वंजारी, नितीन जैन, संतोष साळवे, धीरज तायडे, अल्ताफ पटेल, संघरत्न सपकाळे, मोहम्मद गवळी, रहीम गवळी, मनोज घोडेश्वर, उमाकांत शर्मा, देविदास जोहरे, अशोक प्रधान, किरण पाटील, भगवान नन्नवरे आदी स्वस्त धान्य दुकानदार सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here