साईमत, वरणगाव : प्रतिनिधी
येथील बस स्थानक चौक तिरंगा सर्कल येथे दुपारी शाळा भरताना आणि सुटताना वाहतूक पोलीस आणि शाळेजवळ दामिनी पथक किंवा साध्या वेशातील पोलीस यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन शिवसेना (शिंदे गट) यांच्यावतीने बुधवारी, १९ जून रोजी पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना देण्यात आले. निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, १५ जूनपासून शाळा, विद्यालय, महाविद्यालय सुरू झाले आहे. वरणगावसह परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनी वरणगाव येथे मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करत असतात. बसस्थानक चौक तिरंगा सर्कलजवळ दुपारी ११ ते १२ या वेळेत विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी आणि तिकडून शाळेतून घरी येण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ बस स्थानक चौक तिरंगा सर्कल येथे होत असते. त्यातच मोटरसायकल अवजड वाहन पायी चालणारे यांचे देखील याठिकाणी गर्दी असते.
गर्दीमुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण होते. अशावेळी याठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्त केल्यास शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाट मोकळी होण्यास मदत होईल. दुचाकी वाहनधारकांमध्ये बऱ्याच वेळा याठिकाणी शाब्दिक चकमक होऊन हाणामारीपर्यंत वाद होतो. तसेच राखेचे अवजड डंपर वाहन याच रस्त्यावरून जातात याठिकाणी छोटे-मोठे अपघात होतात. तिरंगा सर्कल चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्यास या सर्व गोष्टी थांबतील.
मुलींच्या छेडखानीचे प्रकार थांबतील…
जी. एस. चौधरी विद्यालय आणि महात्मा गांधी विद्यालय परिसरात शाळा भरतेवेळी आणि सुटतेवेळी रोड रोमिओ यांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात असतो. या दोन्ही विद्यालयाजवळ साध्या वेशातील पोलीस किंवा दामिनी पथक यांची नियुक्ती केल्यास रोडरोमियोंमध्ये धाक निर्माण होऊन मुलींच्या छेडखानीचे प्रकार थांबतील, असेही दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यावर तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशाराही दिला आहे. निवेदन देतेवेळी भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुकाप्रमुख विकास पाटील, संघटक प्रल्हाद माळी, सुनील देवघटोळे उपस्थित होते.