साईमत, पहुर, ता.जामनेर ः वार्ताहर
जागतिक डेंग्यू दिनी प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोद अंतर्गत सर्व उपकेंद्राअंतर्गत असणाऱ्या गावामध्ये गुरुवारी, १६ मे रोजी जनजागृती करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कुमावत, डॉ.थोरात, हिवताप पर्यवेक्षक प्रवीण दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू मलेरिया विषयक हस्त पत्रिका, भित्तीपत्रक पत्रिका, आरोग्याचे संदेश भिंतीवर लिहिण्यात आले. तसेच ध्वनी प्रक्षेपणाद्वारे जनजागृती केली. सार्वजनिक ठिकाणी डेंग्यूविषयी माहिती पत्रके वाटण्यात आली. कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले.
डेंग्यू हा डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे. सहसा हा डास व्हायरस असलेल्या एखाद्या व्यक्तीस चावतात, जे डास चावण्याद्वारे इतर लोकांमध्ये हस्तांतरित होऊ शकतात. डेंग्यूची काही लक्षणे म्हणजे तीव्र ताप, डोकेदुखी, पुरळ आणि स्नायू आणि सांधेदुखी. गंभीर प्रकरणांमध्ये, गंभीर रक्तस्त्राव आणि शॉक असू शकतो. या स्टेजवर डेंग्यू जीवघेणा असू शकतो. मात्र, योग्यवेळी योग्य उपचार करून डेंग्यूला आळा घालता येऊ शकतो. जगातील १०० पेक्षा अधिक देशांमध्ये त्याचा प्रादुर्भाव आहे. दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो आणि या आजाराविषयी जनजागृती केली जाते. आपण त्याचा सामना कसा करू शकतो याविषयी जनजागृती केली जाते. डेंग्यूच्या साथीचे हंगामी स्वरूप असते. पावसाळ्यात आणि नंतर संसर्ग बऱ्याचदा शिगेला पोहचतो, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी सांगितले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. थोरात, आरोग्य निरीक्षक उमेश म्हस्के, आरोग्य सेवक राजेंद्र वाणी, राजु मोरे, राजेंद्र भिवसने, आरोग्य सेवक आर.बी.पाटील, रोहित श्रीखंडे, गटप्रवर्तक माधुरी पाटील, यमुना चौधरी यांच्यासह सर्व आशा सेविका, ग्रामस्थ, इतर कर्मचारी उपस्थित होते.