साईमत, यावल : प्रतिनिधी
शहरात गेल्या काही दिवसांपासून मच्छरांचा उपद्रव वाढला आहे. शहरातील विविध भागात डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. नागरिकांमध्ये आरोग्य विषयक चिंता निर्माण झाली आहे. शहरात डेंग्यू सदृश्य आजाराची साथ पसरण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. म्हणून नगरपालिका प्रशासनासह तालुका आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे उपाययोजना करण्यासाठी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी प्रशासनाला पत्र देऊन मागणी केली आहे.
सविस्तर असे की, संपूर्ण यावल शहरात काही दिवसांपासून मच्छरांचा उपद्रव वाढल्याने शहरातील खासगी रुग्णालयात डेंग्यू व मलेरिया आजारांचे रुग्ण उपचार घेत आहेत. शहराच्या विविध भागांत मोकळ्या जागेवर पाण्याचे व गटारीचे डबके साचलेले आहे. त्यावरील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे एडीस इजिप्ती नावाचे डेंग्यू आजाराच्या अळ्या तयार होत आहे. या अळ्यांमुळे डासांची उत्पत्ती होत आहे. शहरातील नागरिक डेंग्यू व मलेरियाच्या आजारांमुळे बाधीत होत आहे. म्हणून यावल नगरपालिकेने तालुका आरोग्य विभागांची मदत घेऊन घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करावे. ज्या भागात मोकळ्या जागेत डबके साचलेले असतील. ते ठिकाण माती टाकून बुजुन नष्ट करावे, अशी मागणी होत आहे.
यावल शहरातील प्रत्येक भागात जाऊन कानाकोपऱ्यात जाऊन धुरळा फवारणी करावी व गटारीवर बीएससी पावडर मारावी. नगरपालिकेने पथक तयार करून तालुका आरोग्य विभाग यांना सोबत घेऊन घरोघरी रुग्णांची तपासणी करून सर्व्हेक्षण करावे, रूग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार करून मोफत औषधी उपचार करावेत, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे.