राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी त्यांची निवड झाली
साईमत /जळगाव/प्रतिनिधी :
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी आयोजित राज्यस्तर युवा महोत्सवाच्या वक्तृत्व स्पर्धेत डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) ची विद्यार्थीनी कु. दीपाली विनोद सोनी (तृतीय वर्ष – कला) यांनी प्रथम पारितोषिक प्राप्त केले. वक्तृत्व स्पर्धेचा विषय ‘आणीबाणीचा काळ आणि संविधानाचे उल्लंघन’ असा होता.
क्रीडा व युवक सेवा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दिनांक ९ ते १२ जानेवारी २०२६ रोजी, नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी त्यांची निवड झाली असून त्या देशाच्या राजधानीत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यासाठी महाविद्यालयाचे वाड्.मय मंडळ प्रमुख प्रा. दीपक पवार, राज्यशास्त्र विभागाचे शांताराम तायडे, प्रा. अमृता नेतकर आणि प्रा. कल्पना खेडकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या यशाबद्दल दिपाली सोनी यांचे लेवा एजुकेशनल युनियनचे अध्यक्ष आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे, उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. सुनीता पाटील आणि कला मंडळ प्रमुख डॉ. अनिता कोल्हे यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थीनीचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
