आ.किशोर पाटील यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
पाचोरा व भडगाव तालुक्यात सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील सर्व पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार पाचोरा तालुक्यात १६ सप्टेंबर रोजी १८६.८ मिमी, २२ सप्टेंबर रोजी १८६.८ मिमी आणि २३ सप्टेंबर रोजी १३९.८ मिमी असा तब्बल ५१३.४ मिमी पावसाचा विक्रमी आकडा केवळ तीन दिवसांत नोंदवला गेला आहे. भडगाव तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी ९०.७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार हा पाऊस सरासरीपेक्षा तब्बल २१८ टक्क्यांनी जास्त आहे. या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी वाहून गेल्या, विहिरी खचल्या, ठिबक सिंचन पाईपलाईन व फळबागा उद्ध्वस्त झाल्या. पूल, बंधारे आणि डांबरी रस्त्यांनाही मोठे नुकसान झाले असून ग्रामीण भागात सर्वत्र हाहाकार माजला आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांचे केवळ पीकच नाही तर जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे. दुभती जनावरे, बैल, गायी, म्हशी, बकऱ्या, कोंबड्या मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्या. शेतीसाठी आवश्यक असलेली मळणी यंत्रणा, शेतीची अवजारे, गोठे व निवाऱ्यांची बांधकामे पाण्याखाली गेल्याने नष्ट झाली आहेत. ग्रामीण भागातील अनेक घरे कोसळून संसार उद्ध्वस्त झाले आहेत, तर पाचोरा व भडगाव शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानांत पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या गंभीर परिस्थितीचा विचार करून आ. किशोर पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, गेल्या दोन वर्षांपासून पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी विविध नैसर्गिक संकटांचा सामना करत आहेत. मात्र, त्यांना योग्य भरपाई मिळालेली नाही. शासनाने यापूर्वी काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत दिली आहे. त्याच धर्तीवर पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ घोषित करावा आणि शासन निर्णयानुसार शेतकरी, व्यापारी व नागरिकांना तीन पट आर्थिक मदत द्यावी, असे निवेदन आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिले आहे.