नवविवाहित पत्नी ठार, पती गंभीर जखमी
साईमत /पारोळा- जळगाव /प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून महामार्गांवरील वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे. महामार्ग क्रमांक सहावर बायपासजवळील म्हसवे फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृत तरुणीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघातात मृत झालेल्या तरुणीचे नाव रूपाली शुभम बोरसे (वय २१) असे असून गंभीर जखमी पतीचे नाव शुभम भाऊसाहेब बोरसे (वय २५, रा. उंदिरखेडे) असे आहे. शुभम व रूपाली हे दांपत्य दुचाकी क्रमांक एमएच १९ सीके ६२५२ ने कामानिमित्त जळगावकडे जात होते. नेहमीप्रमाणे प्रवास करत असताना म्हसवे फाट्याजवळ रस्ता ओलांडत असतानाच काळाने घाला घातला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरून भरधाव वेगात येणारा ट्रक क्रमांक एचआर ५८ एफ १३१३ याने दुचाकीला जोरदार धडक दिली. सदर ट्रक वसीम इरफान राजपूत (रा. चौरादेव, ता. व जि. सहारनपूर, उत्तर प्रदेश) हा चालक चालवत होता. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की दुचाकी रस्त्यावर फेकली गेली आणि दोघेही खाली पडले.
या अपघातात रूपाली बोरसे यांना डोक्याला, तोंडाला व कमरेस गंभीर मार लागला, तर शुभम बोरसे यांना पायाला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर काही क्षणांतच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दांपत्याला पाहून नागरिकांनी तातडीने मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.
रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांनी प्रसंगावधान राखत जखमी पती-पत्नीला तात्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूपाली बोरसे यांना तपासून मृत घोषित केले. पत्नीच्या मृत्यूची बातमी मिळताच शुभम बोरसे यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात आक्रोश केला. गंभीर जखमी शुभम बोरसे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या प्रकरणी पुरुषोत्तम बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू घडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, महामार्गावरील वाढती वाहतूक, वेगमर्यादेचे उल्लंघन, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि फाट्यांजवळील धोकादायक वळणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे वारंवार समोर येत आहे. स्थानिक नागरिकांनी म्हसवे फाट्याजवळ वेगमर्यादा फलक, गतिरोधक तसेच पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. अन्यथा असे अपघात पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
