फुलगावातील घटना, अखेर १८ दिवस मृत्युशी झुंज ठरली अपयशी
साईमत/वरणगाव/प्रतिनिधी :
सद्यस्थितीत मोकाट श्वानांनी शहर व प्रत्येक गाव परिसरात धुमाकुळ घातला आहे. अशातच एका पिसाळलेल्या श्वानाने एका युवकासह दोन इसमांना चावा घेतला होता. त्यामुळे युवकावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपचारानंतरही युवकाची मृत्युशी झुंज मंगळवारी अपयशी ठरल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील फुलगाव येथे गेल्या २२ ऑगष्ट रोजी एका मोकाट पिसाळलेल्या श्वानाने भल्या पहाटे फुलगाव उड्डाण पुलालगत चौहान बुट हाऊस समोर झोपलेल्या एका ६० वर्षीय इसमाच्या तोंडावर चावा घेवून जखमी केले होते. यानंतर मोकाट श्वानाने आपला मोर्चा फुलगाव गावाकडे वळविला. पिसाळलेल्या श्वानाला हाकलून लावत असतांना श्वानाने गणेश देवराम सोनवणे (वय ३०) या युवकाला चावा घेतला होता. त्यामुळे गणेश सोनवणे याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून तेथील एक दिवसाच्या उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला घरी जावून काही औषधोपचार घेण्याचा जाण्याचा सल्ला दिला. मात्र, १८ दिवसानंतर गणेश सोनवणेला सोमवारी रात्री अचानक जास्त प्रमाणात त्रास होवू लागल्याने त्याला पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र, त्याठिकाणी गणेशची मृत्युशी झुंज अपयशी ठरल्याने मंगळवारी, १० सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे फुलगावात मोकाट श्वानांबाबत मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात असलेल्या श्वानांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. मयत गणेश याच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, पत्नी, आई – वडील असा परिवार आहे. सर्वसाधारण कुटुंबातील मनमिळावू एक कर्ता पुरुष गेल्याने गावात शोककळा पसरली आहे.
म्हैससह बकरीलाही घेतला चावा
मोकाट पिसाळलेल्या श्वानाने तीन इसमांसह गावातीलच एका बकरीला व म्हशीलाही चावा घेतला होता. या चाव्यामुळे बकरीसह म्हशीचाही मृत्यू झाल्याने पाळीव पशु जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शासन स्तरावरून मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी वरणगावसह परिसरातून होत आहे.