साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
येथील जुने गावातील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ एप्रिल ते ६ मे या कालखंडामध्ये सामूहिक श्री गुरूचरित्र पारायण व अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञेने झाला.
केंद्रात २४ तास साखळी पद्धतीने दोन सेवेकरी वीणा वादन, दोन सेवेकरी स्वामी चरित्र वाचन, दोन सेवेकरी श्री स्वामी समर्थ जप माळ, सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत महिला सेवेकरी, सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत पुरुष सेवेकऱ्यांनी सेवा रुजू केली. सात दिवसात रोज नित्य स्वाहाकार, गणेश याग, मनोबोध याग, श्री चंडी याग, श्री स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग झाला. सप्ताहाची सत्य दत्त पूजन करून सांगता झाली.
श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी सोहळा शोभायात्रा मिरवणूक ६ रोजी सायंकाळी शहरातून काढण्यात आली. ठिकठिकाणी सडा समार्जन, रांगोळ्या, जागोजागी पालखीचे पूजन, आरती यामुळे अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झालेले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक सेवेकरी उपस्थित होते. सप्ताह काळात खा.रक्षा खडसे, आमदार एकनाथराव खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, ॲड.रोहिणी खडसे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक पदाधिकारी, मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेतला.