चाळीसगाव इंडियन मेडिकल असोसिएशनची आर्त हाक
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
कोलकत्ता येथील आर.जे.वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या एका महिला डॉक्टरवर अत्याचार, बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला होता. डॉक्टरांनी आपआपले हॉस्पिटल्सचे बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवून, काळ्या फिती बांधून निदर्शने करून, घोषणा देत आंदोलन करुन निषेध नोंदविला. ‘लाडकी बहिण नको….आम्हास ‘सुरक्षित बहिण’ हवी’, अशी चाळीसगाव इंडियन मेडिकल असोसिएशनने आर्त हाक दिली. दरम्यान, अत्यावशक सेवा सुरु होत्या. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशन, वीर सावरकर चौकात धरणे आंदोलन केले. घोषणा देत तहसीलदार, माजी खासदार उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तहसीलदार, माजी खासदार उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण, निर्भय पार्टीचे अध्यक्ष तुषार निकम, रामलाल चौधरी यांनी मनोगतातून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मागण्या ऐकून घेऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी रोटरी क्लब, इन्नरव्हील क्लब, हिरकणी महिला मंडळच्या सदस्या यांनी पाठिंबा दर्शवून निषेध नोंदविला. यावेळी डॉ.संघटनेचे सचिव डॉ.किरण मगर, उपाध्यक्ष डॉ.पल्लवी पाटील, माजी अध्यक्ष डॉ.उज्ज्वला देवरे, माजी सचिव डॉ.सुनील राजपूत, डॉ.शुभांगी पूर्णपत्रे, डॉ.महेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करत सर्व सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.