१५ हजारांची लाच घेताना वनपाल व खासगी पंटर एसीबीच्या जाळ्यात
साईमत/ रावेर /प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांना अद्याप आळा बसलेला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रावेर तालुक्यात निलंबनाची भीती दाखवून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वनपालासह त्याच्या खासगी पंटरला जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. या प्रकरणी वनपाल राजेंद्र अमृत सरदार आणि खासगी पंटर दीपक रघुनाथ तायडे यांच्याविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
तक्रारदार हे यावल वन विभागाच्या जिन्सी (ता. रावेर) वनक्षेत्रात वनरक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातील रोप वनातील निंदणीच्या कामाची तपासणी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. या तपासणीनंतर वनपाल राजेंद्र सरदार यांनी तक्रारदाराला व्हॉट्सॲप कॉल करून निंदणीच्या कामात त्रुटी असल्याचा आरोप करत निलंबनाची धमकी दिली.
निलंबन टाळायचे असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी बावणे यांना १५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आली. ही रक्कम थेट न देता खासगी पंटर दीपक तायडे याच्याकडे ‘फोन पे’द्वारे देण्याची सूचना सरदार यांनी केली.
डिजिटल व्यवहार आणि रोख रकमेचा खेळ
तक्रारदार ‘फोन पे’ वापरत नसल्याने त्यांनी स्वतःच्या भ्रमणध्वनीतील ‘योनो’ ॲपद्वारे १३ हजार २५० रुपये खासगी पंटर तायडे याच्याकडे ऑनलाइन पाठवले. या व्यवहाराचा स्क्रीनशॉट त्यांनी वनपाल सरदार यांना पाठवला. उर्वरित १ हजार ७५० रुपये रोख स्वरूपात अहिरवाडी येथील शासकीय निवासस्थानी जाऊन थेट वनपाल सरदार यांच्याकडे देण्यात आले. अशा प्रकारे एकूण १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.
एसीबीची कारवाई
या प्रकाराला कंटाळून तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. चौकशीत वनपाल सरदार यांनी तक्रारदाराकडून भ्रमणध्वनीद्वारे १३ हजार २५० रुपये व रोख १ हजार ७५० रुपये स्वीकारल्याची कबुली दिली.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या तक्रारीवरून वनपाल राजेंद्र सरदार आणि खासगी पंटर दीपक तायडे यांच्याविरोधात रावेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वनखात्यातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे.
