साईमत / जळगाव
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी सरकारने महत्त्वाचा दिलासा दिला आहे. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे केवायसी अपूर्ण किंवा चुकीचे आहे, त्यांना सुधारणा करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.
योजनेअंतर्गत यापूर्वी डिसेंबरपर्यंत केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अनेक महिलांकडून माहिती भरताना चुका झाल्यामुळे त्यांचा लाभ अडकला. त्यामुळे सरकारने या महिलांना अंतिम संधी देत मुदत वाढवली आहे.
केवायसीतील त्रुटींमुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले होते. डिसेंबरपासून मिळणारी रक्कम त्यांना मिळाली नव्हती. आता केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या महिलांना चार महिन्यांचे थकित पैसे एकाच वेळी मिळण्याची शक्यता आहे. ही रक्कम अंदाजे ६००० रुपये असू शकते.
दरम्यान, ज्या महिलांनी केवायसी योग्यरित्या पूर्ण केले आहे, त्यांचा लाभ नियमितपणे सुरू आहे आणि पुढेही सुरू राहणार आहे. तर केवायसीत दुरुस्ती आवश्यक असलेल्या महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही लाभ दिला जाणार आहे.
