पिंगळवाडे शाळेचे उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षकरत्न” पुरस्काराने सन्मानित
साईमत/अमळनेर/प्रतिनिधी
तालुक्यातील पिंगळवाडे जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन जिल्ह्यातील जामनेर येथील जिनियस मास्टर्स फाउंडेशन संस्थेतर्फे दिला जाणारा 2024-25 या वर्षाचा जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
फाउंडेशनतर्फे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक याप्रमाणे १४ शिक्षक व जामनेर तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक तसेच शिक्षण, कृषी, पोलीस, महसूल, आरोग्य आदी विभागातील प्रत्येकी एक अधिकारी-कर्मचारी याप्रमाणे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४६ पुरस्कारार्थींना सन्मान पदक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
जामनेर येथील एकलव्य विद्यालयाच्या सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन जामनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ग.स.चे उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.जळगावचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, जळगाव ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील,
उपशिक्षणाधिकारी एन.एफ.चौधरी, संचालक योगेश इंगळे, योगेश सनेर, निलेश पाटील, मनोज पाटील, अनिल गायकवाड, विनोद पाटील, कृष्णा सटाले, सचिन वाघ, विपिन पाटील, सलीम शेख, संदीप पाटील, नंदलाल पाटील, सुरेश अंभोरे, मधु लहासे, प्रदीप सोनवणे, संजय पाटील, फाऊंडेशनचे मार्गदर्शक तथा गटनेते अमर पाटील, अध्यक्ष रमेश पाटील यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमास जिल्ह्याभरातून शिक्षक, त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार, विविध शिक्षक पतपेढीचे संचालक, शिक्षक संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत पाटील, नामदेव पाटोळे तर आभार किरण पाटील यांनी मानले.