लेखी तक्रारींकडे संबंधितांचे दुर्लक्ष, पोल बसविण्याची मागणी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील पिंप्राळा भागातील जिल्हा परिषद कॉलनी आणि सहयोग कॉलनीतील वॉर्ड क्रमांक १० मध्ये इलेक्ट्रीक पोल (विजेचे खांब) नसल्याने अंधार पसरतो. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. तसेच टारगट मुले-मुली अंधाऱ्याचा फायदा घेऊन कट्ट्यावर गोंधळ घालतात. दुसरीकडे परिसरात पसरलेल्या अंधाऱ्याच्या भीतीमुळे घरगुती महिला रात्री फिरण्यासाठी बाहेर निघत नाही. अशा गंभीर समस्येकडे वार्डाच्या नगरसेवकांचे दुर्लक्ष झाल्याची ओरड परिसरातील नागरिकांसह महिलांनी केली आहे. यापूर्वी यासंदर्भात वेळोवेळी संबंधितांना लेखी अर्ज देऊनही समस्या अद्यापही सुटलेली नाही. त्यामुळे परिसरात त्वरित विजेचे खांब बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील पिंप्राळा भागातील जिल्हा परिषद कॉलनी आणि सहयोग कॉलनीतील वॉर्ड क्रमांक १० मध्ये विजेच्या खांब्याअभावी अंधार पसरलेला असतो. त्यामुळे विजेची समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात संबंधित नगरसेवकांना वारंवार तोंडी सांगूनही अद्यापही विजेचे खांब बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्री-अपरात्री परिसरात येणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
अनुचित प्रकार घडण्याची शक्यता
गेल्या एक वर्षापासून अशा समस्याकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे. दुसरीकडे अज्ञात चोरटेही त्याचा गैरफायदा घेऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे यासंदर्भात संबंधित विभाग आणि मनपाने दखल घ्यावी, अशी मागणीही सारांश फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष नीलू इंगळे यांनी केली आहे.