कुऱ्हा पानाचे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात संतप्त युवकांसह ग्रामस्थांचा ‘दांगडो’

0
113

विद्यमान सरपंच पतीने काढता पाय घेतला

साईमत/भुसावळ/प्रतिनिधी

तालुक्यातील सुनसगाव येथून जवळील कुऱ्हा पानाचे येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात संतप्त ग्रामस्थांसह युवकांनी एकत्रित येत सोमवारी, ७ रोजी ‘दांगडो’ केला होता. त्यामुळे विद्यमान सरपंच पती यांनी काढता पाय घेतला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबतचा व्हिडीओ कुऱ्हा गावात अनेकांच्या मोबाईलवर दिसत आहे. दरम्यान, सरपंच यांच्यासह काही सदस्य रिकामे राजकारण करत आहे. त्यामुळे त्यांनी गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी प्रमुख मागणी सुज्ञ ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कुऱ्हा पानाचे ग्रामपंचायत चर्चेत आहे. गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनावर निवेदने दिली जात आहेत. गावात ग्रामपंचायत सदस्यांची ‘आधे इधर आधे उधर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे की काय? गावाचा विकास ठप्प होण्याच्या मार्गावर आला आहे. सरपंच पदाचा कार्यकाळ वाटून घेतलेला असल्याने आपल्या काळात जास्तीचे कामे व्हावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे असतांना ग्रामविकास अधिकारी प्रकरण गाजविले जात आहे. त्याचाच परिणाम की काय? ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास खळवाळी भागातील अनेक रहिवाशी युवक एकत्रित आले होते.

व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चांना उधाण

यावेळी खळवाळी भागातील अनेक रहिवाशी युवकांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी सरपंच पती प्रमोद उंबरकर यांनी युवकांना समजवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, खळवाडी भागातील नमुना नं ८ च्या विषयावर सरपंच व काही सदस्य पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याने खळवाडी परिसरातील युवक चांगलेच संतापलेले दिसले. या युवकांच्या प्रश्नांना उत्तरे देता येत नसल्याने तसेच युवक संतापलेले असल्याने सरपंच पती प्रमोद उंबरकर यांनी काढता पाय घेतल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. यासंदर्भात गावात चर्चांना उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here