प्रतिष्ठानने शैक्षणिक क्षेत्रातील योगदान पाहून कार्याची घेतली दखल
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक, ज्येष्ठ कवी-साहित्यिक, समाजसेवक डी. डी. पाटील यांना भगीरथ इंग्लिश स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देऊन ‘समाज चिंतामणी’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी आर.डी.कोळी, कवी जयसिंग वाघ, पूर्व शिक्षा अधिकारी नीलकंठ गायकवाड, डी.बी.महाजन, भास्कर चव्हाण, श्री.बडगुजर यांच्यासह समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
गेल्या पंधरा वर्षापासून डी. डी. पाटील हे जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा गेल्या १३ एप्रिलला ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते “अमृता यात्री डी. डी. पाटील” स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. अहिल्याबाई होळकर वाचनालय व ग्रंथालय स्थापन करून त्यांनी युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून ते सदैव प्रयत्नशील असतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र उभारणे, युवकांसाठी व्यायामशाळा, महिलांसाठी बचत गट, अशा विविध घटकाच्या उन्नतीसाठी ते प्रयत्नशील असतात.
त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन तसेच साहित्य क्षेत्रातील योगदान पाहून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल साहित्यिक, कवी, लेखकांसह अनेक स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
