साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
तालुक्यात अस्मानी चक्रीवादळामुळे अनेकांना चक्रीवादळाचा सामना करावा लागला तर यामध्ये भीमनगर येथील रहिवासी रवींद्र निकम हे महादेवाच्या मंदिरात पावसामुळे बसले असता मंदिरावरील घुमट डोक्यात पडून मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे अनेकांच्या घरावरील तीन पत्रे उडाले तर झाडे उन्मळून पडले आहे. तसेच समर्पण लोन येथील लग्नप्रसंगी काम करणाऱ्या स्वयंपाकी महिलांच्या अंगावर भिंत कोसळल्याने एक महिलेचा हात तुटला तर तीन महिला जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले. तसेच समर्थ लॉनवरील तीन सेट उडाले आहे.
भीमनगर येथील मोलमजुरी करणाऱ्या रवींद्र विश्राम निकम (वय ५५) हे महादेवाच्या मंदिरात चक्रीवादळ आणि पावसामुळे आसरा घेण्यासाठी मंदिरात बसले होते. तेव्हा मंदिरावरील घुमट त्यांच्या डोक्यावर पडला. ही घटना घडल्यानंतर त्यांना ‘समतेचे निळे वादळ’ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अशांतभाई वानखेडे यांनी दवाखान्यामध्ये दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, रवींद्र निकम यांचा मृत्यू झाला.
येथील मूकबधिर विद्यालयातील निवासस्थानी निंबाचे आठ ते दहा झाडे उन्मळून पडले आहे. अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने विजेचे तार तुटले तर खांब तुटून पडले आहे. त्यामुळे गोरगरिबांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर बुलढाणा रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडल्याने ट्राफिक जाम झाली होती. तसेच दाताळा जवळील टोल नाक्यावरील तीन पत्रे उडाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चक्रीवादळामुळे रात्रीपासून वीज खंडित झाली होती.
वादळी वाऱ्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना मिळणार ४ लाख रुपये
मलकापूर येथे रविवारी, २६ मे रोजी अस्मानी चक्रीवादळामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यात मलकापूर तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात मलकापूरातील भीमनगर येथील रवींद्र निकम यांच्या डोक्यावर महादेवाच्या मंदिरावरील घुमट पडून मृत्यू तर मलकापूर येथून जवळील बेलाड येथील निवृत्ती इंगळे (वय ५७) यांच्या अंगावर निंबाचे झाड पडून मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. लवकरच त्यांना शासनाची चार लाख रुपयांची मदत मिळणार आहे. त्याचबरोबर चक्रीवादळामुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीचा सर्वे करून मदत मिळणार असल्याची माहिती मलकापूर येथील उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.