साईमत, जळगाव : प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील निंभोरासीम ते पिंप्रीनांदु दरम्यानच्या दोघे फाट्यापासून ते तापी पुलापर्यंत रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू केले आहेत. हे संचारबंदी आदेश फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी लागू केले आहेत.
केळी पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नसल्याने पिक विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने सचिन रमेश पाटील (चोरवड, ता. रावेर) व योगेश ब्रिजलाल पाटील (रा. मुंजलवाडी, ता. रावेर) हे १८ ऑक्टोबरपासून रावेर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे. त्यातील उपोषणार्थी रमेश नागराज पाटील हे रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता निंभोरासीम ते पिंप्रीनांदु दरम्यान असलेल्या तापी पुलावरुन उडी मार आंदोलन करणार आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पिंप्रीनांदु ते निंभोरासीम दरम्यान तापी नदीवरील पुलावर प्रवेश बंदी केला आहे. या परिसराची कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जनजीवन सुरळीत रहावे, याकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू केली आहे.
संचारबंदी आदेशातून अत्यावश्यक सेवा तसेच शासकीय दौरे, शासकीय कर्तव्यावर हजर अधिकारी, कर्मचारी, पोलीस, रुग्णसेवा, पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था तसेच सरकारी, खासगी बँक, पतसंस्था व अंत्यविधी यांना लागू राहणार नाहीत, असे आदेशात नमूद केले आहे.