साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र जळगावद्वारे राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील माध्यमिक विद्यालयात नुकताच सांस्कृतिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनींनी संगीत, गायन, नृत्य तसेच पथनाट्याच्या माध्यमातून आपले कलाप्रकार प्रदर्शित करून सांस्कृतिक दिवस कार्यक्रमात उत्साहपूर्ण सहभाग घेतला. सुरुवातीला युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी देशभक्तीपर गीते, पोवाडे, जनजागृतीसाठी पथनाट्य व मनमोहक नृत्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाला गणेशपूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटोळे, पर्यवेक्षक लखन पाटील, अरुण अहिरे उपस्थित होते. हा कार्यक्रम नेहरू युवा केंद्र, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी श्री. नरेंद्र, लेखापाल अजिंक्य गवळी तसेच तालुका समन्वयक शंकर पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसिद्ध युवती मंडळाच्या अध्यक्षा वैशाली शिंदे यांनी आयोजित केला होता. सांस्कृतिक दिवस कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माध्यमिक विद्यालयातील इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला. सूत्रसंचालन श्री.भदाणे तर आभार एस.वाय.पाटील यांनी मानले.