चाळीसगाव तहसीलमधील फौजदारी लिपीक एसीबीच्या जाळ्यात

0
18

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

प्रतिबंधक कारवाईच्या प्रस्तावात तारीख न देता जामिनावर मुक्तता करण्यासाठी अडीच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना चाळीसगाव तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक दीपक बाबुराव जोंधळे (वय ४७, रा.शास्त्रीनगर, प्लॉट नंबर १६, कापड मिल मागे, चाळीसगाव) यास गुरुवारी, १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता तहसीलमधील दालनातच अटक करण्यात आली. या कारवाईमुळे लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की, ३० वर्षीय तक्रारदार यांच्या पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्यात मेहुणबारे पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरीता तसेच मदत करण्यासाठी त्यातील फौजदारी लिपिक दीपक बाबुराव जोंधळे यांनी गुरुवारी अडीच हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने तक्रार नोंदविताच लाच पडताळणी करण्यात आली. दुपारी साडेचार वाजता दालनातच जोंधळे यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक केली. संशयिताविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, मकरंद पाटील, चालक हवालदार सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here