क्रेनिओटॉमी अॅण्ड अॅक्युट हिमॅटोमा इव्हॅक्युएशन शस्त्रक्रीया डॉ. उल्हास पाटील महाविद्यालय, रूग्णालयात यशस्वी
जळगाव (प्रतिनिधी)-
अपघातात गंभीर जखमी झाल्याने डोक्यात गंभीर रक्तस्त्राव व रक्ताची मोठी गाठ आढळून आलेल्या रूग्णावर क्रेनिओटॉमी अॅण्ड अॅक्युट हिमॅटोमा इव्हॅक्युएशन शस्त्रक्रीया करून त्याचे प्राण वाचविण्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालयाच्या मेंदू, मणका विकार तज्ज्ञांना यश आले.
अपघातात मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवे येथील गणेश इंगळे या रुग्णाला वाहनाची जबर धडक बसली. यात रुग्णाच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर रुग्ण बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत त्याच्या डोक्यात गंभीर रक्तस्त्राव झाल्याचे निदर्शनास आले. रुग्णावर मेंदू व मणक्याचे विकार तज्ञ डॉ. विपूल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासण्या करण्यात आल्या.
तपासणीत डोक्यात अॅक्युट सबड्युरल हिमॅटोमा म्हणजेच रक्ताची मोठी गाठ आढळून आली. या स्थितीत त्वरित शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने, मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड आणि त्यांच्या टीमकडून क्रेनिओटॉमी अॅण्ड अॅक्युट हिमॅटोमा इव्हॅक्युएशन या पध्दतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेद्वारे डोक्याचा एक भाग उघडून त्या भागातील जमा झालेले रक्त पूर्णतः बाहेर काढण्यात आले. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचे प्राण वाचवले गेले असून, त्याची प्रकृती आता ठणठणीत आहे. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. आशिष बावनकर, डॉ. ऋषिकेश कुळकर्णी, डॉ. किरण जोगावडे, भूलशास्त्र तज्ञ यांनी सहकार्य केले.
अशा स्वरूपाच्या गंभीर दुखापतीत वेळेवर निदान आणि तात्काळ शस्त्रक्रिया हे रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी अत्यावश्यक ठरते. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया अनुभवी टीममार्फत यशस्वीरीत्या पार पाडली.