आठ डंपर जप्त; तहसीलदार व पोलीस यांनी संयुक्तपणे केली कारवाई
साईमत/मलकापूर /प्रतिनिधी :
अवैध रेती उपसा व वाहतुकीमुळे शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या वाळू माफियांना प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. दि.२४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता कोटेश्वर-जमनापुरी घाट, मौजा नरवेल येथे महसूल व पोलीस विभागाने संयुक्त धडक कारवाई करत रेतीने भरलेले आठ डंपर पकडले. जप्त करण्यात आलेल्या रेतीची अंदाजे किंमत सुमारे १ कोटी ६२ लाख रुपये असल्याची माहिती आहे.
जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या आदेशानुसार आणि मलकापूर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मलकापूर तहसीलदार समाधान सोनवणे मलकापूर शहरचे ठाणेदार गिरी यांच्यासोबत थेट मैदानात उतरून वाळू माफियांवर धडक कारवाई केली.
या कारवाईत डंपर क्र.(एम.एच.२८-बी.बी.४१७२), (एम.एच.२८-बी.बी.८९१०), (एम.एच.२८-बी.बी.२८९५), (एम.एच.२८-बी.बी.६१७४), (एम.एच.२८-बी.बी.७३९७), (एम.एच.२८-बी.बी.४४१४), (एम.एच.२८-बी.बी.१२१०) हे वाळुचे डंपर जप्त करण्यात आले असून ही कारवाई नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, मंडळ अधिकारी कुलवंतसिंग राजपूत, धरणगाव मंडळ अधिकारी व्ही.एन.कोल्हे, तलाठी धीरज जाधव (मलकापूर), राहुल खर्चे (दसरखेड), महसूल सेवक पंकज जाधव, सचिन चोपडे तसेच पोलीस आरसीबी पथकाने केली.
नदी, घाट व पर्यावरणाची लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने आता ‘शून्य सहनशीलता’ धोरण अवलंबले असून, अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा या धडक कारवाईतून देण्यात आला आहे. रेती माफियांना पाठीशी घालणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही, असा कडक संदेश प्रशासनाने दिला आहे.सर्व डंपर रेतीने भरलेले असून, प्राथमिक चौकशीत अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित वाहनचालक व मालकांविरोधात महसूल व खनिज कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
