Strike Action: अवैध बायोडिझेल रॅकेटवर धडक कारवाई; २९ हजार किलो बायोडिझेल जप्त

0
5

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

साईमत/मलकापूर /प्रतिनिधी : 

जिल्ह्यात बेकायदेशीर बायोडिझेल वाहतूक करणाऱ्या रॅकेटवर जिल्हा प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत तब्बल २९,०३० किलो बायोडिझेल जप्त केले असून याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनमुळे अवैध इंधन व्यापार करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

वडनेर-मलकापूर रोडवर संशयास्पद अवस्थेत उभा असलेला (जी.जे.०३- डब्ल्यू.बी.३०३८) क्रमांकाचा टँकर प्रशासनाच्या नजरेस पडला. माहिती मिळताच तपास पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपासणीदरम्यान टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात बायोडिझेल आढळून आल्यानंतर जप्तीची कारवाई करण्यात आली. प्रशासनाने जप्त केलेल्या २९,०३० किलो बायोडिझेलची एकूण किंमत ३३ लाख ३३ हजार १४९ रुपये असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्राथमिक चौकशीत टँकरमधील बायोडिझेल गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील पिपलोद, अंकलेश्वर येथील होसटेफ कॉर्पोरेशनकडून औरंगाबाद येथील आष्टी रोडवरील ‘बाबा सीताराम ट्रेडिंग’ या ठिकाणी घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. या पुराव्यांमुळे अवैध बायोडिझेल वाहतुकीची मोठी साखळी कार्यरत असल्याचा अंदाज वर्तविला जात असून पुढील तपासात या नेटवर्कमधील आणखी नावे उजेडात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर इंधन व्यवहाराविरुद्ध कठोर भूमिका घेत, कुठेही संशयास्पद बायोडिझेल टँकर, गोदाम किंवा व्यवहार दिसल्यास नागरिकांनी तातडीने प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. या प्रकरणातील पुढील तपासाची जबाबदारी पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांनी विविध पुरावे आणि धागेदोऱ्यांच्या आधारे तपास अधिक गतीने पुढे नेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अवैध इंधन व्यापाराविरुद्ध जिल्हास्तरावर सुरू झालेल्या या मोठ्या कारवाईनंतर पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या घडामोडी समोर येण्याची शक्यता असून या रॅकेटचा संपूर्ण भंडाफोड होण्याची चिन्हे प्रशासन वर्तवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here