पर्यटकांसह सामान्य नागरिकांना प्रवेश बंद, पोलिस बंदोबस्त
साईमत/धानोरा, ता. चोपडा/ प्रतिनिधी :
यावल तालुक्यातील सावखेडासीम, चुंचाळे, नायगाव येथून जवळच असलेले निंबादेवी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मंगळवारी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. मात्र, सांडव्याच्या भिंतीला तडा गेल्याने ती कोसळण्याची भिती प्रशासनाने व्यक्त केली. ही स्थिती पाहता दुर्घटना रोखण्यासाठी तहसीलदारांनी निंबादेवी धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले. वनविभाग व पोलिसांनी बंदोबस्तदेखील लावला आहे.
यावल तालुक्यातील पश्चिम भागात सावखेडासीम या गावापासून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी निंबादेवी धरण आहे. दरवर्षी पावसाळ्यात ऑगस्टमध्ये धरण भरून सांडवा ओसंडतो. भुशी डॅमसारखे चित्र तयार होते. सांडवास्थळी पायऱ्यांवरून वाहणारे पाणी जिल्हाभरातील पर्यटकांना आकर्षित करून घेते. मात्र, यंदा सातपुड्यात अल्प पावसाने धरण भरायला २२ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागली. २३ सप्टेंबरला सकाळी सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. परंतु, धरणाच्या मुख्य भिंतीपासून सुमारे ५०० मीटर लांब अंतर व खालील बाजुने असलेल्या सांडव्याच्या भिंतीला तडा गेल्याचे समोर आले. यामुळे सांडव्याची भिंत कोसळण्याची भिती निर्माण झाली. ही माहिती मिळताच तलाठी, पोलिस पाटील पंकज बडगुजर यांनी पाहणी केली.
याबाबत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना माहिती दिली. तहसीलदार नाझीरकर यांनी पाटबंधारे विभागाला खबरदारीच्या सूचना देत निंबादेवी धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले. यानंतर पोलिस व वनविभागाने याठिकाणी बंदोबस्त लावला. धरण परिसरातील प्रवेश रोखले. धरण सांडव्याच्या या भिंतीला तडा गेला. पण, ती पाण्यामुळे दिसत नाही.
२.५० दलघमी क्षमतेचे धरण
२.५० दलघमी क्षमतेच्या निंबादेवी धरणाची खोली २२ मीटर आहे. या घरणामुळे ८०० एकर शेती क्षेत्र ओलिताखाली येते. या तालुक्यातील पश्चिम भागातील विविध गावांना पाण्याचा फायदा होतो. चुंचाळे व सावखेडा गावापासून जवळच असलेले निंबादेवी धरण अखेर बहुप्रतिक्षेनंतर आज पूर्णपणे भरले आहे. मात्र, बाजुच्या कडेने असलेली संरक्षण भिंत काही प्रमाणात ढासळली आहे. यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. याची प्रशासनाने दखल घेण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धरण भरत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. पण आज रोजी ४०५ एमएम पाऊस झाला आहे. यामुळे पूर्ण धरण भरले, मात्र निंबा देवी धरण यावर्षी परतीच्या पावसात भरले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. धरणाची पूर्ण पातळी दोन पॉईंट ४२८ दशलक्ष घनमीटर आहे. त्यामुळे या धरणापासून चुंचाळे, नायगाव, सौखेडासीम, नावरे, बोराळे, विरावलीसह यावलपर्यंत शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
तालुक्यातील निंबादेवी धरण प्रेक्षणीय एक पर्यटनस्थळ झालेल्या असल्याने येथे जिल्हाभरातीलच नव्हे तर मध्य प्रदेशातील काही ठिकाणचे लोक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी किंवा तेथील नयनरम्य दृश्य बघण्यासाठी येतात. निसर्गरम्य अशा धरणासाठी प्रशासनाची धावपळ असते. तरीदेखील यावर्षी धरण भरण्याआधी दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.भिंत कोसळल्याचे वृत्त कळताच धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी जाहीर केले आहे.