तीन वर्षांपासून खंडु वाघे स्वखर्चाने राबविताहेत ‘भुतदया’ उपक्रम
साईमत/वरणगाव/प्रतिनिधी :
पशु, पक्षी व मुक्या प्राण्यांवर ‘प्रेम हीच खरी ईश्वर सेवा’ ही मनोभावना मनाशी बाळगून वरणगावातील सत्य साई सेवा मंडळाचे सदस्य खंडु वाघे दैनंदिन सकाळी स्वखर्चाने सातमोरी पुलाजवळ कावळ्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ टाकुन त्यांची काऊ घासाने भुक भागवित आहेत. त्यांच्या सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपण या जगात अनेक माणसांना विविध पशु, पक्षी, प्राण्यांवर प्रेम करतांना पाहिले आहेच. त्यामध्ये काही जणांकडून कावळ्यांना अशुभ मानले जात असले तरी याच कावळ्यांना पितृपक्षात तसेच दशक्रिया विधीच्यावेळी तांदुळाच्या भाताने केलेल्या पिंडदानाला कावळ्यांनी काऊ घास खावा आपल्या दिवंगत माता – पित्यांना मोक्ष मिळावा, यासाठी त्यांना दशक्रियेच्या दिवशी स्मशानभुमीलगत तर पितृपक्षात आपआपल्या घराच्या गच्चीवर ‘काव….काव…’असा आवाज देवून आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी एखाद्या कावळ्याने काऊ घास खाल्यास त्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या पूर्वजांनी भोजन केल्याचे समाधान वाटते. मात्र, वरणगावातील किरकोळ भाजीपाला विक्रेते तसेच सत्य साई सेवा मंडळाच्या भक्तगणातील सदस्य खंडु वाघे (वय ५५) यांना कावळ्यांचा लळा लागला आहे. ते गेल्या तीन ते चार वर्षापासून कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न साधता दैनंदिन सकाळी ८ वाजेदरम्यान नित्य नियमाने वरणगाव ते मुक्ताईनगर जुन्या महामार्गावरील सातमोरी पुल गाठतात. याच ठिकाणी एका झाडावर काही कावळे त्यांच्या प्रतिक्षेत बसून असल्याचे दिसतात. यावेळी त्यांना खंडु वाघे यांचे दर्शन होताच कावळ्यांचा ‘काव….काव…’ असा गलबला सुरू होतो. खंडु वाघे आपली दुचाकी लावून सोबत आणलेल्या विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचा काऊ घास त्यांच्यापुढे टाकताच असंख्य कावळे टाकलेल्या काऊ घासवर येथेच्छ ताव मारून आपली भुक भागवितांना दिसतात. हे दृष्य पाहून खंडु वाघे यांना मोठ्या प्रमाणात आत्मिक समाधान मिळत असल्याचे ते सांगतात. इतकेच नव्हेतर परमेश्वरच हे कार्य माझ्या हातून करून घेत असल्याची सद्भावनाही त्यांनी बोलून दाखवली. तसेच पशु, पक्षी व प्राण्यांवर प्रेम हीच खरी मानव सेवा असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, भुतदयेपोटी कावळ्यांच्या काऊ घाससाठी पोळ्या, चिवडा, बिस्कीटे अशा विविध प्रकारचे खाद्य पदार्थ खरेदी करण्यासाठी त्यांचे दैनंदिन किमान ४० ते ५० रुपये खर्च होत आहे. पैशांचा विचार न करता त्यांनी हे कार्य दैनंदिन सुरूच ठेवले आहे.
कावळ्यांनाही लागला लळा
रोज विविध प्रकारचे कावळ्यांना खाद्यपदार्थ मिळत असल्याने सातमोरी पुलाजवळील कडुलिंबाच्या झाडावर किंवा पुलावरील कठड्यांवर सकाळच्या दरम्यान कावळ्यांची शाळा भरलेली दिसते . यावेळी खंडु वाघे दिसताच सर्व कावळे ‘काव….काव…’ करीत त्यांच्याकडे येतांना दिसतात. यामुळे कावळ्यांनाही खंडु वाघे यांचा एक प्रकारे लळा लागल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस मोबाईल टॉवर, वाढते तापमान, शेती पिकांवर मारले जाणारे रासायनिक द्रव्य, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास अशा अनेक बाबींमुळे पशु पक्षांची संख्या कमी होतांना दिसत आहे. मात्र, वरणगाव येथे काऊ घास खाण्यासाठी दिवसेंदिवस कावळ्यांची संख्याही वाढतांना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.