साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
गेल्या २५ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आयशर वाहनातून दहा गोमातांसह त्यांच्या दहा वासरांना कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे कोंबून एरंडोल येथील कासोदा नाकामार्गे हैद्राबाद येथे घेवून जाण्यात येत होते. त्यावेळी वि.हिं.प.चे धरणगाव तालुकाध्यक्ष श्रीपाद शंभूप्रसाद पांडे हे बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष आकर्ष विरेंद्रकुमार तिवारी आणि भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष ॲड.संजय छगन महाजन यांच्यासह एरंडोल येथे गेले होते. त्याठिकाणी ॲड.अजिंक्य आल्हाद काळे, ॲड.निरज अतुलकुमार जगताप, ॲड.चंद्रकांत सुरेश पारखे आणि एरंडोल येथील असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी श्रीपाद शंभूप्रसाद पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने दहा गोमातांसह त्यांच्या दहा वासरांना संगोपनासाठी धरणगाव येथील कामधेनु सेवा मंडळ येथे दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहे.
त्यानंतर सरदार गुलाब मेवाती (रा.बांबरूड (राणीचे), ता.पाचोरा) यांनी दहा गोमातांसह त्यांच्या दहा वासरांचा ताबा मिळण्यासाठी एरंडोल येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जाकामी फिर्यादी श्रीपाद शंभूप्रसाद पांडे आणि साक्षीदार ॲड.अजिंक्य आल्हाद काळे यांनी गोमातांसह वासरांचा ताबा हा सरदार मेवाती याला देण्यात येवू नये, म्हणून लेखी हरकत घेतली होती.
सरकार पक्षातर्फे ॲड.वळवी यांनी धरणगाव येथील कामधेनु सेवा मंडळाच्यावतीने ॲड.राहुल शांतीलाल पारेख यांनी तर फिर्यादी व साक्षीदार यांनी घेतलेल्या हरकतीबाबत ॲड.आल्हाद माधव काळे यांनी न्यायालयात मुद्देसूद युक्तिवाद करून पशु वाहतूक कायदा, नियम व पशु वाहतूक वेळी घ्यावयाची काळजी याबाबत न्यायालयात बाजू मांडली. त्यावर निकाल देतांना न्यायालयाने सरदार मेवाती याचा गोमाता आणि त्यांच्या वासरांचा ताबा मिळण्याचा अर्ज हा नामंजूर करून गोमातांसह त्यांच्या वासरांना धरणगाव येथील कामधेनु सेवा मंडळात राहू देण्याचा आदेश न्यायालयाने पारित केला आहे.