पारोळ्यातील आगीवर वेळीच नियंत्रण
साईमत/पारोळा/प्रतिनिधी
पारोळा शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये आज सकाळी घडलेल्या आगीच्या घटनेत नगरसेवक पंकज मराठे यांनी दाखवलेल्या तत्परता, धाडस आणि नेतृत्वामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. सावजी हॉटेलच्या पाठीमागील एका गोडाऊनला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
सकाळच्या सुमारास गोडाऊनमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ नगरसेवक पंकज मराठे यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाला तात्काळ पाचारण केले तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधत आवश्यक त्या सूचना दिल्या.
नगरपरिषदेचे कर्मचारी, सहकारी व स्थानिक नागरिक यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या. विशेष बाब म्हणजे नगरसेवक पंकज मराठे यांनी केवळ मार्गदर्शनापुरते न थांबता स्वतः प्रत्यक्ष अग्निशमन कार्यात सहभाग घेतला. हातात अग्निशमन उपकरण घेऊन त्यांनी आग विझवण्याच्या कामात सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायी कृतीमुळे अग्निशमन कर्मचारी व नागरिकांनाही अधिक उत्साह मिळाला.
सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच आग आजूबाजूच्या इमारतींमध्ये पसरण्यापासून रोखण्यात आल्याने मोठे आर्थिक नुकसानही टळले. संभाव्य मानवी व आर्थिक अनर्थ टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
या घटनेनंतर नगरसेवक पंकज मराठे यांच्या तत्परतेचे, धाडसाचे आणि जबाबदार लोकप्रतिनिधित्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमदार अमोल पाटील, नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले आहे. संकटाच्या प्रसंगी लोकप्रतिनिधी स्वतः पुढे येऊन मदतीला धावतो, यामुळे नागरिकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र या घटनेतून स्पष्टपणे दिसून येते.
