एक लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त, एमआयडीसी पोलिसांची कारवाई
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांनी संघटीत गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या चोरी करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला एक लाख ८५ हजार रुपये किमतीचा तांब्याचा मुद्देमाल जप्त केल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या गुन्हे शोध पथकाने केली.
सविस्तर असे की, जगवाणी नगर गेटसमोरील एका दुकानाचे शटर उचकावून आणि चैनल गेट तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. त्यांनी दुकानातून सुमारे ३५० किलो वजनाचे ६५ हजार रुपये किमतीचे जुने तांबे आणि १५० किलो वजनाच्या एक लाख २० हजार रुपये किमतीच्या नवीन तांब्याच्या तारा असा एक लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
दोघांना शिताफीने घेतले ताब्यात
गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आणि आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पथकातील पोलीस शिपाई राहुल घेटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, रितेश संतोष आसेरी (वय ४६, रा. रणछोडदास नगर, जळगाव) याला त्याच्या घरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याचा साथीदार रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी (वय ३२) याला पो.हे.कॉ. गणेश शिरसाळे, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.कॉ.नितीन ठाकूर, किरण पाटील आणि राकेश बच्छाव यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पाठलाग करून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
चोरीचे जुने आणि नवीन तांब्याचे तार जप्त
आरोपींनी चोरी केलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हस्तगत केला आहे. तपासाकामी सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, रवी नरवाळे आणि अक्रम शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी आरोपींकडून ५४ हजार रुपये किमतीचे १०० किलो वजनाचे जुने आणि नवीन तांब्याचे तार जप्त केले आहेत. सध्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि पो.कॉ. योगेश घुगे करत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पो.हे.कॉ. गणेश शिरसाळे, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.कॉ.नितीन ठाकूर, राहुल घेटे, किरण पाटील, राकेश बच्छाव यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, रवी नरवाळे, अक्रम शेख यांनी केली आहे.
