वीज ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी व संताप व्यक्त होत आहे.
साईमत/भडगाव/प्रतिनिधी :
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सत्तेत असताना प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट वीज मोफत दिली होती. त्यानंतर त्यांच्याच पक्षाने पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारकडून ३०० युनिटपर्यंत प्रत्येक कुटुंबाला मोफत वीजपुरवठा केला. या राज्यांमध्ये या योजनेमुळे वीज कंपनी व राज्याचे बजेट फायदेशीर ठरले आहे.
महाराष्ट्रात मात्र महागडा वीजपुरवठा देत वीज दर सतत वाढत असल्याने राज्यातील वीज ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी व संताप व्यक्त होत आहे. दिल्ली व पंजाबमधील यशस्वी योजनांच्या पार्श्वभूमीवर येथेही कमीत कमी २०० युनिट वीज मोफत पुरवावी, अशी मागणी पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, राष्ट्रपती पदकाने सन्मानित सेवानिवृत्त पीएसआय पी.ए. दादा पाटील यांनी केली.
या मागणीला राज्यातील विविध घटकांतील वीज ग्राहकांचे समर्थन मिळाले आहे. त्यांनी म्हटले की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अदाणी आणि अंबानी यांच्या मोठ्या वीज कंपन्या सर्वात महाग वीजपुरवठा करत आहेत, त्यामुळे जनतेवर मोठा आर्थिक ताण पडत आहे. यावर राज्य सरकारने तातडीने लक्ष देऊन नागरिकांना सोयीस्कर व किफायतशीर वीजपुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
