पाटणादेवीला अतिधोकादायक तितूर नदीवरील तात्पुरत्या पुलाच्या उभारणीच्या कामाला प्रारंभ

0
45
पाटणादेवीला अतिधोकादायक तितूर नदीवरील तात्पुरत्या पुलाच्या उभारणीच्या कामाला प्रारंभ-saimatlive.com

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

गेल्या ३ वर्षांपासून पुरातत्त्व विभागाच्या कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या आदिशक्ती चंडीकादेवी पाटणादेवी मंदिराजवळील तितूर नदीवरील पुलाच्या कामाला नवरात्र उत्सवात मुहूर्त मिळाला नाही. आ.मंगेश चव्हाण यांनी आमदार निधीतून दोन वेळा २५ लाख रुपयांच्या निधीचे पत्र देऊनही नवीन पुलाच्या बांधकामासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली नाही. पाटणा ग्रामस्थांनी पुलासाठी जलसमाधी घेण्याचे आंदोलनही पुकारले होते.

अतिशय धोकेदायक व पाण्याचा प्रचंड प्रवाह असणाऱ्या नदीतून जीव मुठीत धरत यावर्षीही लाखो भाविक भक्तांना मार्ग काढावा लागतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे आ.मंगेश चव्हाण यांनी कामासाठी पुढाकार घेतला आहे. भाविकांच्या सोयीसाठी तितूर नदीवर तात्पुरत्या स्वरुपात पुलाच्या उभारणीचे काम गुरुवारी, १२ ऑक्टोबरपासून सुरु केले आहे. आ.मंगेश चव्हाण यांनी स्वतः कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करुन पुलाच्या उभारणी संदर्भात सूचना दिल्या. पाटणादेवीच्या सेवेसाठी अखेर पाटणादेवीचे निस्सीम भक्त आ.मंगेश चव्हाण यांनीच पुढाकार घेतल्याने शारदीय नवरात्र उत्सवाला दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची मोठी सोय यानिमित्त होणार आहे. पाहणीवेळी वन्यजीव विभागाचे अधिकारी देसाई, श्री.जाधव, पाटणाचे सरपंच नितीन पाटील, माजी नगरसेवक भास्कर पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भावेश कोठावदे, मनोज गोसावी आदी उपस्थित होते.

खान्देशची कुलदैवत आदिशक्ती चंडीकादेवी (पाटणादेवी) च्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. भाविकांच्या सोयीसुविधा व उत्सवाची तयारी पाटणा ग्रामपंचायत, ग्रामस्थ, मंदिर ट्रस्ट मार्फत केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मंदिराचे संपूर्ण नियंत्रण पुरातत्त्व विभागाने घेतल्याने भाविकांच्या सोयीसुविधांची वानवा होत आहे. हि बाब लक्षात घेत आ.मंगेश चव्हाण यांनी यावर्षीचा नवरात्र उत्सव अविस्मरणीय करण्याचा संकल्प केला आहे. पाटणादेवी मंदिर व परिसर नऊ दिवस नवदुर्गा संकल्पनेवर आधारित सजविला जाणार आहे. तसेच देवीला दागिन्यांचा साज घालून मढविले जाणार आहे. भाविकांच्या वाटेत विद्युत रोषणाईही केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांना एक वेगळीच अध्यात्मिक अनुभूती मिळणार आहे.

पाटणादेवीच्या चरणी सेवा अर्पण

लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर देवीचा भक्त या नात्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणी येऊ नये, त्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाच्या वेळकाढू नियमांच्या मागे न लागता स्वतः पुढाकार घेऊन तात्पुरता पूल उभारून देत आहे. ही सर्व सेवा आई पाटणादेवीच्या चरणी अर्पण करत असल्याची भावना आ.मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here