साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
संविधानाचा प्रास्ताविक आत्मा आहे. ते संविधानाचे पहिले पान आहे. संविधानाची ओळख असून त्यात ध्येय व उद्दिष्ट सांगितले आहे. सर्वांग सुंदर संविधान सामाजिक जीवन जगण्याचा जिवंत दस्ताऐवज आहे. तसेच जीवनाचा मध्यम मार्ग आहे. प्रत्येकाने दैनंदिन जीवनात संवैधानिक जीवन जगायला पाहिजे. वाड्या, पाड्या, वस्ती, घराघरात संविधान पोहचले पाहिजे. संविधानाचा सन्मान व प्रामाणिकपणे अंमलबजावणी करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे वर्तन व आचरणाने संविधानाचे संवर्धन होईल. आम्ही भारताचे लोक म्हणून ही जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे प्रतिपादन तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी केले. तालुक्यातील तळेगाव, कृष्णनगर, हातगाव ग्रा.पं, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव येथे ७४ वा संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
तळेगाव येथे सरपंच दीपाली मोरे, जगदीश निकम, ग्रा.पं.सदस्य गुणवंत शेलार, जगन मोरे, सुदाम मोरे, अनिल गोरे, समाधान सोनवणे, भावडु पाटील, साहेबराव देवरे, अनिल निकम, यशवंत देशमुख, दिलीप शेलार, प्रकाश गुंजाळ, बारकु सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. संविधानाच्या प्रास्ताविकतेचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी सामूहिक वाचन घेऊन संविधानाची जनजागृती, प्रचार-प्रसार संविधान लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, यादृष्टीने संविधानाच्या प्रास्ताविकतेची फ्रेम तळेगाव ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतही संविधानाचे वाचन व अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शाळा क्र.१ व २ चे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन गायकवाड, अतुल बोरसे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. यानंतर कृष्णनगर, हातगाव ग्रा.पं. याठिकाणी तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी संविधानाची प्रास्ताविक फ्रेम भेट देऊन संविधानावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृष्णनगर येथे ग्रामसेवक साळुंखे भाऊसाहेब, गोरख मोरे, मनोज चव्हाण, उमेश भोसले, गोवर्धन राठोड, प्रकाश चव्हाण, दिनेश चव्हाण तर हातगाव येथे ग्रा.पं.सदस्य प्रकाश निकम, दत्तु नागरे, पत्रकार निलेश पाटील, संदीप सानप, सदस्य, ग्रामस्थ तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, संविधान प्रेमी उपस्थित होते.