मोर्चेकऱ्यांचे ‘कचरा फेका, मडके फोडा’आंदोलन
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :
आगामी काही दिवसात पावसाळ्यामुळे सामान्य जनतेला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. अशातच सर्व समस्यांबाबत न.प.प्रशासनाला गेल्या २० दिवसांपूर्वी (६ मे रोजी) निवेदन देऊनही प्रशासनाची कुंभकर्णी झोप उडालेली नाही. त्यामुळे गुरुवारी, २९ मे रोजी हुतात्मा स्मारक ते नगर परिषद कार्यालयापर्यंत गाढव मोर्चा काढून न.प.येथे ‘कचरा फेका, मडके फोडा’ आंदोलन करण्यात आले. मोर्चात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यासह नगरवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
न.प. प्रशासनाच्या कामचुकार, बेलगाम, भ्रष्ट कारभारामुळे मलकापूर शहरातील नाले अनेक दिवसांपासून स्वच्छ होत नाहीत. दररोज रस्त्यांची स्वच्छता होत नाही. नित्य कचरा संकलन होत नाही. पूर्णा मायला मुबलक पाणी आहे. असे असूनही १५ दिवसात पाणीपुरवठा होत नाही.पाणी पुरवठा लिकेज दुरुस्त होत नाही. रस्त्यावरील पथदिवे बंद असतात. हायमास्ट लाईटस् बंद असतात. अशा मलकापूर नगर पालिकेच्या सर्व विभागांच्या अनागोदी, कामचुकार व भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला समस्या आणि अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
‘न.प.हाय हाय’, ‘भाजपा सरकारचा निषेध असो’, ‘मुख्याधिकारी, प्रशासक मुर्दाबाद’चे नारे देत मोर्चा न.प.कार्यालयावर पोहोचल्यानंतर तेथे मडके फोडण्यात आले. तसेच कचरा फेकण्यात येऊन शहराध्यक्ष राजू पाटील, ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष हाजी राशिदखा जमादार, अॅड.हरीश रावल, सुहास (बंडू) चवरे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ॲड.जावेद कुरेशी, ॲड.मजीद कुरेशी यांनी आपल्या वक्तव्यातून न.प. प्रशासक, मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला.
मोर्चाने जनतेचे लक्ष वेधले…!
आगामी काळात पाणी पुरवठा व्यवस्था, लिकेज दुरुस्ती, कचरा संकलन, नाली साफसफाई, रस्ते परिसर साफसफाई, पथ दिवा आदी व्यवस्था व्यवस्थित न केल्यास मुख्याधिकारी, प्रशासकांच्या तोंडाला काळे फासुन त्यांची गाढवावरून धिंड काढण्यात येईल, अशी तंबी दिली. विशेष म्हणजे मोर्चातील पुढे डफडे वाजवत मागे-मागे गळ्यात पाटी, सजविलेले दोन गाढव त्याच्यावर भाजपा सरकार, प्रशासक, मुख्याधिकारी न.प.मलकापूर लिहिलेले नागरिकांचे लक्ष वेधुन घेतले.