काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.व्ही.डी.पाटील यांनी आचारसंहिता भंगाची केली तक्रार दाखल

0
20

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.व्ही.डी.पाटील यांनी धरणगाव येथील निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी अधिकाऱ्यांची शनिवारी, २३ मार्च रोजी भेट घेऊन पंतप्रधान विश्‍वकर्मा योजनेबद्दल निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याबद्दल तक्रार दाखल केली. त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सलिम बेलदारही उपस्थित होते.

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने पंतप्रधान विश्‍वकर्मा योजना लागू केली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतांना जनतेकडून सेतू सुविधा केंद्रावरून या योजनेअंतर्गत अवजारे खरेदीसाठीच्या नावाने पंधरा हजार रुपये मिळण्यासाठीचे अर्ज भरून घेतले जात आहेत. सरकारकडून पंधरा हजार रुपये मिळणार या आशेने जनतेने गावागावात सेतू सुविधा केंद्रावर गर्दी केली आहे. हे आदर्श आचारसंहितेचे सरळसरळ उल्लंघन आहे.

मतदारांनी सत्तापक्षाला मत देण्यासाठी फसवणूक करण्याचा प्रकार आहे. कारण हे अर्ज भरून घेतल्यानंतर त्याची छाननी होणे आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणे हे सगळे अनिश्‍चित असतांना हे अर्ज स्वीकारले जात आहेत., जे आचारसंहिता लागू असतांना अत्यंत चुकीचे आहे. म्हणून धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.व्ही.डी.पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संकेतस्थळाने अर्ज स्वीकारणे तातडीने बंद करावे, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here