नवा इतिहास घडविण्याच्या तयारीत काँग्रेस : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार

0
24

जिल्ह्यातील सर्व ११ जागांची चाचपणी; इच्छुकांचे तब्बल ३५ अर्ज

येत्या विधानसभेसाठी काँग्रेसने पक्ष संघटन मजबूत करण्यासह जिल्ह्यात गमाविलेला प्रभाव पुर्नस्थापित करण्यासाठी प्रयत्नांना गती दिली आहे. आमचे संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते त्यादृष्टीने कामाला लागलेले आहेत. राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष निर्णायक भूमिकेत असून आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविण्याची मानसिकता पक्षात आता तरी आहे. आघाडी अंतर्गंत जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदार अथवा जागा सुटतील, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही, तरी पण जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ जागांसाठी इच्छुकांचे तब्बल ३५ अर्ज पक्षाच्या प्रदेश समितीकउे दाखल केले गेले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष नवा इतिहास घडविण्याच्या तयारीत असल्याचा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी विविध राजकीय पक्षांची लगबग सुरु झाली आहे, त्यात काँग्रेस पक्षही मागे राहणार नाही. नव्वदच्या दशकात राजकीय दृष्ट्या प्रबळ असलेल्या काँग्रेसची स्थितीनंतरच्या काळात कमकुवत होऊन जिल्हा परिषदेसारख्या जिल्हाव्यापी संस्थांवरील पक्षीय सत्ताही राहिली नाही. मात्र, आता जिल्ह्यात पक्षाचे कार्यकर्ते संघटीत होतांना आणि पक्षीय प्रभाव पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्नाला लागलेले दिसतात. संपूर्ण जिल्ह्यात जिल्हाव्यापी प्रभाव असणारा नेता या पक्षाकडे सध्या तरी नाही. एकूण ११ मतदार संघांपैकी फक्त रावेर-यावलमध्ये शिरीष चौधरी हे एकमेव काँग्रेसचे आमदार आहेत. राजकीय दृष्ट्या जिल्ह्यात काँग्रेस आपला पूर्वीसारखा प्रभाव निर्माण करु शकेल, तर तो एक चमत्कार ठरेल, पण राजकारणात चमत्कार होतात का?

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघात आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना यश मिळालेले नसले तरी काँग्रेस पक्ष भक्कमपणे आघाडी सोबत राहिला. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आघाडी कोणते मुद्दे घेऊन लढते यावर बरेच काही अवलंबून आहे. तथापि, विधानसभेच्या ११ जागांसाठी इच्छुकांचे तब्बल ३५ अर्ज उमेदवारीसाठी पक्षाकडे दाखल होणे हे देखील पक्षातंर्गंत उत्साहाचे संकेत म्हणता येईल.

काँग्रेसतर्फे उमेदवारीची दावेदारी केलेल्यांमध्ये स्वतः पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार हे पाचोरा-भडगाव मतदार संघांसाठी प्रबळ दावेरदार आहेत तर चोपडा राखीव मतदार संघासाठी जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे (यावल), मुक्ताईनगरसाठी डॉ.जगदीश पाटील, जामनेरसाठी एस.टी.पाटील आणि शंकर राजपूत इच्छूक आहेत तर अमळनेरमधून के.डी.पाटील आणि संदीप घोरफडे दावा करीत आहेत. सर्वाधिक अर्ज भुसावळ या राखीव मतदार संघातून पक्षाकडे आलेले आहेत. १२ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

आघाडीत जादा जागा मिळावी ही अपेक्षा

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार हे दै.‘साईमत’शी बोलतांना म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही अर्थात काँग्रेसने पूर्णपणे सहकार्य केले, याची जाणीव रा.काँ.चे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेचे उबाठा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याची पूर्ण जाणीव आहे, असा आम्हाला विश्वास आहे, तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत आघाडी अंतर्गंत आम्हाला अधिक जागा मिळाव्यात, अशी आमची रास्त अपेक्षा आहे. जिल्ह्यात महायुती विरोधात वातावरण असून त्याचा फायदा आघाडी तर काँग्रेसला निश्चितपणे मिळेल. काँग्रेसचा जनाधार जिल्ह्यात कायम असून तुल्यबळ उमेदवारांना पक्षाने तिकीट दिल्यास निश्चित विजय होईल, असेही ते म्हणाले.

रावेरमधून शिरीष चौधरी की धनंजय चौधरी?

रावेर-यावलचे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरतात की, त्यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना रिंगणात उतरवता याची प्रतीक्षा आहे. तथापि, काँग्रेस राज्यस्तरीय बड्या नेत्यांनी धनंजय चौधरींच्या उमेदवारीवर आपली पसंती दर्शविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here