साईमत, बोदवड : प्रतिनिधी
येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी शिबिराचा दत्तक गाव हिंगणे येथे नुकताच समारोप करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विकास कोटेचा होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणे येथील सरपंच मनिषा रामराव पाटील, संस्थेचे संचालक रवींद्र माटे, आनंद जैस्वाल, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्ही. पी. चौधरी उपस्थित होते.
सात दिवस चाललेल्या शिबिरात रा. से. यो.च्या स्वयंसेवकांनी गावाशेजारील नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण केले. गावासह शाळेच्या परिसराची स्वच्छता करून गावातील लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला. स्वच्छता, पर्यावरण व ग्रंथ दिंडीमध्ये पथनाट्य व घोषवाक्य यांच्या माध्यमातून विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. शिबिरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून अथर्व काजळे तर उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून जयश्री वांगेकर यांची निवड करण्यात आली.
शिबिरात झालेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. यासाठी संस्थेचे अध्यक्ष मिठुलाल अग्रवाल, उपाध्यक्ष अजय जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक रामराव पाटील, भारत पाटील, अशोक पाटील, रवींद्र पाटील, वैभव पाटील, भैय्या पाटील, सौरभ पाटील यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी प्रा. अजित पाटील, अतुल पाटील यांच्यासह सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. समारोप समारंभाचे प्रास्ताविक महिला कार्यक्रम आधिकारी डॉ. वंदना नंदवे तर अहवाल वाचन कार्यक्रम आधिकारी प्रा. नितेश सावदेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रीती पाटील तर आभार प्रा. युवराज आठवले यांनी मानले.