चोरट्यांचा संगणकाच्या तीन संचावर डल्ला, गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धीविनायक चौकात रात्रीच्या वेळी बंद असलेल्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून चोरट्यांनी संगणकाचे तीन संच लांबविले आहे. ही घटना १४ जूनला रात्री ते १५ जून रोजी सकाळच्या दरम्यान घडली. साहित्य चोरी झाल्याचे १५ रोजी सकाळी सात वाजता लक्षात आले. दरम्यान, चोरी झालेल्या परिसरात एकाकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे. मात्र, ते बाहेरगावी गेलेले असल्याने फुटेज मिळू शकले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धीविनायक चौकात मनीषा विशाल पाटील (वय ४३) यांचे घराशेजारीच कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. तेथे विद्यार्थ्यांचे क्लास घेतले जातात. १४ जून रोजी रात्री ८ वाजता इन्स्टिट्यूट बंद केले होते. मध्यरात्री चोरट्यांनी इन्स्टिट्यूटचा दरवाजाचा कडीकोयंडा कापला. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करून ३ मॉनिटर, ३ सीपीयू, ३ की बोर्ड, ३ माऊस, केबल आदी साहित्य लांबविले आहे. याप्रकरणी मनीषा पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. रामकृष्ण इंगळे करीत आहेत.