यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील सावखेडासीम येथील ग्रामपंचायतीला २०२० पासून मिळालेल्या निधीत अनियमितपणा आणि अपहार झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, १० महिन्यांपासून त्याची चौकशी न झाल्याने यावल पंचायत समितीचे माजी गटनेते आणि ग्रामस्थांनी १४ ऑगस्टपासून यावल पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणाला महाविकास आघाडीने पाठिंबा देऊन १८ रोजी रास्ता रोको केला होता. त्याच आधारे पुन्हा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सावखेडासीमच्या ग्रामस्थांनी सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११:४५ ते दुपारी ४:४५ वाजेपर्यंत अंकलेश्वर- बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर यावल येथे टी- पॉईंटवर मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे पाच तास यावल येथून चोपडा, फैजपूर, रावेर, भुसावळ, जळगाव आणि ग्रामीण भागात एकही एसटी बस किंवा चार चाकी वाहन जाऊ न दिल्यामुळे रास्ता रोको आंदोलन तब्बल ४ तास झाल्यानंतर जिल्हा परिषदेला आणि संबंधित सर्व यंत्रणेला घाम फुटला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन कारवाई करण्याबाबत लेखी आश्वासन दिले. आश्वासनानंतर उपोषणार्थीं आणि आंदोलनकर्त्यांनी आंदोलनासह उपोषण मागे घेतले.
आंदोलन तब्बल साडेचार ते पाच तास इतक्या मोठ्या वेळपर्यंत सुरू राहिल्याने डी.वाय.एस.पी. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चार वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष उपोषणार्थी तसेच आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे की, जिल्हा परिषदेमार्फत संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षण, महाराष्ट्र राज्य (मुंबई) यांच्याकडून ग्रामपंचायत सावखेडासीम, ता. यावल येथील वरीलप्रमाणे विषयात नमूदनुसार विशेष लेखा परीक्षणाची मागणी केली आहे. त्या लेखा परीक्षणाअंती सिध्द होणाऱ्या अनियमितताबाबत प्रशासकीय कारवाई आणि अपहाराविरुध्द गुन्हे दाखल करणे व अपहारीत रक्कम वसूल करण्याची कारवाई करता येईल.
ग्रामसेवकाची विभागीय चौकशी प्रस्तावित
सद्यस्थितीत प्राथमिक चौकशी अहवालात सिध्द होणाऱ्या अनियमितेसंदर्भात संबंधित ग्रामसेवकाची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार याबाबतीत संबंधितास शिक्षा करण्यापूर्वी बाजु मांडण्याची संधी देणे आवश्यक आहे. याप्रकरणी समुचित कारवाई करण्यात येत असल्याचे तसेच विशेष लेखापरीक्षण पथकासमक्ष पुरावे सादर करण्याची आणि दखल करण्याची संधी दिली जाईल. याबाबत आश्वस्त करण्यात आले. तसेच सुरु असलेले आमरण उपोषण सोडून प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती केल्याने उपोषणार्थीं तसेच आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन उपोषण मागे घेतले.